छत्रपती संभाजी महाराजांचा घुमला जयघोष 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

सपत्नीक बुलेटवर स्वार... 
फेरीत मालोजीराजे व मधुरिमाराजे, तर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व रूपाली नांगरे-पाटील सपत्नीक सहभागी झाले होते. डोक्‍यावर भगवे फेटे घालून सहभागी या दांपत्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

कोल्हापूर - जय भवानी जय शिवाजी, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा जयघोषात शाहू यूथ फाउंडेशनतर्फे सळसळत्या उत्साहात "पन्हाळा ते कोल्हापूर' बुलेट फेरी काढण्यात आली. वडणगे येथे फेरीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. डोक्‍यावर भगवे फेटे व प्रबोधनात्मक फलक घेऊन कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फेरीचे आयोजन केले होते. 

गडावरील शिवाजी मंदिराची कार्यकर्त्यांनी स्वच्छता करून फुलांनी सजावट केली. फाउंडेशनचे मार्गदर्शक मालोजीराजे छत्रपती, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, मधुरिमाराजे छत्रपती, रूपाली नांगरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत फेरीचे उद्‌घाटन झाले. या वेळी मालोजीराजे म्हणाले, ""शिवछत्रपतींप्रमाणे संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अभ्यास होणे आवश्‍यक आहे. तो करण्यासाठी उदयोन्मुख इतिहास अभ्यासकांनी पुढे यावे.'' श्री. नांगरे-पाटील म्हणाले, ""संभाजी महाराज यांच्याकडे असलेली ऊर्जा आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. ती आजच्या पिढीला दिशा देणारी आहे.'' फेरीस सुरवात झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी निसर्ग संवर्धनासाठी रस्त्याच्या दुतर्फा देशी झाडांच्या बिया टाकण्यात आल्या. पन्हाळा, वाघबीळ, केर्ले, वडणगे, गंगावेस, रंकाळवेस, तटाकडील तालीम, निवृत्ती चौक, गांधी मैदान, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, छत्रपती शिवाजी चौक ते भवानी मंडप येथे आली. या ठिकाणी श्री. नांगरे-पाटील यांनी फाउंडेशनतर्फे भवानी मंडपात भरविलेल्या "जागर इतिहासाचा' या गडकोटांवरील छायाचित्र प्रदर्शनास भेट देऊन त्याचे कौतुक केले. फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप पाटील, स्वप्नील यादव, ऋषीकेश देसाई, प्रसाद वैद्य, विजय अगरवाल, नरेश इंगवले यांनी फेरीचे संयोजन केले.यावेळी झालेल्या व्याख्यानात पानिपतकार विश्‍वास पाटील म्हणाले,छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा विस्तार संभाजीरांनी केला. साडेतीनशे किल्ले कायमपणे ताब्यात ठेवले. निवडक मावळ्यांसह बलाढ्य औरंजेबाबरोबर निधड्या छातीने टक्कर दिली. सह्याद्रीचा कोट करून तलवारीच्या जोरावर 111 लढाया लढल्या. कर्नाटकातील एक पराभव वगळता कायम अजिंक्‍य ठरले. संभाजीराजांची एवढी दहशत होती की औरंगजेबाने पश्‍चिम महाराष्ट्रात शिरकावही केला नाही. 

शिवरायांची नावे प्राणपणाने संभाजीराजांनी जपली. राष्ट्रासाठी प्रसंगी जान कशी कुर्बान करावी, हे संभाजीराजांकडून शिकावे. संभाजीराजांचा स्फूर्तीमय इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची गरज आहे.तरुणांनी शिवराय,संभाजीराजे यांना जाणून घ्यायला हवे. 

Web Title: Panhala to Kolhapur bullet round