पाऊले चालती पावनखिंडीची वाट

पाऊले चालती पावनखिंडीची वाट

आषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी माणसं या मोहिमेच्या माध्यमातून हजारो जणांना छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी चालत नेऊन पावन खिंडीतील रणसंग्रामाचा इतिहासच मांडतात. अशा या साहसी सहलींचा थोडक्‍यात परिचय. 

पन्हाळा-पावनखिंड मोहिमेचा आनंद सर्वांना 
पन्हाळा-पावनखिंड मोहिमेचा आनंद घेण्याची इच्छा अनेकांना असते; पण कोणाला पारिवारिक कारणाने तर कोणाला शारीरिक मर्यादांमुळे हे ५४ किलोमीटरचे अंतर पार करणे शक्‍य होत नाही. मग त्यांना या आनंदापासून वंचित रहावे लागते. हीच बाब ध्यानात घेऊन करवीर हायकर्स यांनी एका विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. ज्यांना ठरावीक अंतरच चालायचे आहे. त्यांच्यासाठी कोल्हापुरातून गाडीची सोय करण्यात आली आहे. त्यांना माळवाडी, खोतवाडी येथून पावनखिंड मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. दीपक सावेकर यांनी या मोहिमेचे आयोजन केले असून पन्हाळा-पावनखिंड मोहीम सर्वांसाठी हेच त्यांच्या मोहिमेचे वैशिष्ट्य असून २१ जुलै रोजी ही मोहीम निघणार आहे. 

शाहिरीचा रोमांच, व्याख्यानातून प्रबोधन 
सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी पन्हाळा - पावनखिंड मोहिमेचे आयोजन केले जाते. हेमंत साळोखे आणि प्रवीण हुबाले हे या मोहिमेचे नियोजन करतात. या मोहिमेची सुरुवात पन्हाळा किल्ल्यावरून होते. खोतवाडी, कर्पेवाडी, पांढरे पाणी, पावनखिंड असा हा ५४ किलोमीटरचा मार्ग आहे. सह्याद्री प्रतिष्ठान दरवर्षी २५० ते ३०० जणांना या मोहिमेची अनुभूती देतात. मोहिमेमध्ये सहभागी लोकांना शाहिरांचा पोवाडा, पावनखिंडीचा रणसंग्राम मांडणारी व्याख्याने आयोजित केली जातात. हे सह्याद्री प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य आहे. या माध्यमातून एका ऐतिहासिक घटनेची महती ते सर्वांपर्यंत पोहचवण्याचे कार्य करतात. यंदा १२, १३ जुलै दरम्यान ही मोहीम निघणार आहे. 

लघुपटातून जाणून घ्या इतिहास...
शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र गेली २६ वर्षे पन्हाळा-पावनखिंड या मोहिमेचे आयोजन करतात. यावर्षी त्यांनी एका अभिनव उपक्रमाचे आयोजन मोहिमे दरम्यान केले आहे. मोहिमेच्या कालावधीत पावनखिंडीतील रणसंग्राम पहिल्यांदाच लघुपटाच्या रूपाने मोहिमेत सहभागी झालेल्या लोकांना दाखवण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना दिलेली कवड्याची माळ दाखवली जाईल. १३ ते १५ जुलै या कालावधीत ही मोहीम निघणार आहे. प्रशांत साळोखे यांनी या मोहिमेचे आयोजन केले आहे. इतिहासाबरोबर येथील निसर्गवैभवाची माहितीही ते या मोहिमेत देतात. 

अनुभवा मोहिमेतील रात्रीचा थरार 
छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्यरात्री भर पावसातून जंगलातून वाट काढत सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटका करून घेतली. मैत्रेयी प्रतिष्ठानने तो रात्रीचा थरार अनुभवण्याची संधी लोकांना उपलब्ध करून दिली. गेली ३७ वर्षे सातत्याने रात्रीच्या पन्हाळा - पावनखिंड मोहिमेचे आयोजन प्रतिष्ठानकडून केले जाते. डॉ. अमर अडके हे या साहसी मोहिमेचे आयोजन करतात. एखाद्या लष्करी मोहिमेला साजेसेच हे नियोजन असते. आघाडी पथक, ध्वज पथक, सुरक्षा पथक, मुख्य संरक्षक पथक अशी रचना करून ते लोकांना नेतात. रात्रीच्या अंधारात भर पावसात जंगलातील वाट तुडवत ते आपल्या ओघवत्या वक्‍तृत्वातून तो ऐतिहासिक प्रसंग डोळ्यासमोर उभा करतात. यंदा ही मोहीम १३,१४ जुलै या कालावधीत आहे.

बिजारोपण वृक्षांचे अन देशभक्तीचे 
शिवाजी पेठेतील आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था आहे. त्यांनी शिवकालीन युद्धकला संवर्धित केली आहे. तरुणांना या युद्ध कौशल्याचे धडे देण्याचे कार्य ते करतात. त्याचबरोबर पन्हाळा-पावनखिंड मोहिमेचे आयोजनही त्यांच्याकडून केले जाते. मोहिमेच्या मार्गात ते वृक्षांचे बिजारोपण करतात. कालांतराने त्यातील बहुतांशी बिजांचे वृक्ष होतात. त्यांच्या मोहिमेला पर्यावरण संवर्धनाचा एक आयाम लाभलेला आहे. मोहीम मार्गातील गावांमध्ये ते औषधेही वाटतात. छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास मांडतात. एका अर्थाने देशभक्तीचे बिजारोपण तरुण मनांमध्ये करतात. पंडित पोवार हे मोहिमेचे आयोजन करत असून यंदा ही मोहीम १३, १४ जुलै या कालावधीत आहे. 

मोहीम अनुभवा कुटुंबासोबत 
पन्हाळा-पावनखिंड मोहीम करणारे बहुतांशीजण तरुण किंवा तरुणी असतात. त्यांच्या कुटुंबीयांनाही या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा असते. पण तेथील मर्यादित व्यवस्था, मुक्कामाची ठिकाणे यामुळे कुटुंबीय मात्र मोहिमेत सहभागी होऊ शकत नाहीत. अशा व्यक्तींसाठी सागर पाटील यांच्या कोल्हापूर हायकर्सचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. कोल्हापूर हायकर्स कुटुंबीयांना या मोहिमेची अनुभूती देते. उत्तम व्यवस्था, मुक्कामाची चांगली ठिकाणे हे त्यांचे वेगळेपण आहे. यामुळे मोहिमेचा विलक्षण अनुभव तुम्ही कुटुंबीयांसोबत घेऊ शकता. या वर्षी ही मोहीम २०,२१ जुलै या कालावधीत आहे. 

इतिहासाचे पदर उलगडणारी मोहीम 
महाराष्ट्रातील गडकोटांचा विषय निघाला, की भगवान चिले हे नाव आपसूकच येते. गेली कित्येक वर्षे भगवान चिले लोकसहभागातून गडकोट संवर्धनाचे कार्य करत आहेत. पन्हाळा-पावनखिंड मोहीम हा देखील त्यांच्या कार्याचा एक पैलू आहे. अत्यंत कडक शिस्तीमध्ये निघणारी त्यांची मोहीम गेली १८ वर्षे सुरू आहे. दरवर्षी ३०० लोक या मोहीमेत सहभागी होतात. निसर्गवेध परिवार या संस्थेच्या माध्यमातून ते या मोहिमेचे आयोजन करतात. शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुरू होणारी त्यांची मोहीम इतिहासाचा एक एक पदर उलगडत पुढे सरकत असते कारण भगवान चिले स्वतः हा जाज्ज्वल्य इतिहास लोकांसमोर मांडतात. मोहिमेतून मिळणारे पैसे ते रांगणा किल्ल्याच्या संवर्धनासाठी खर्च करतात. यंदा निसर्गवेध परिवारची मोहीम २१,२२ जुलै या कालावधीत होणार आहे.

मोहिमेतून सामाजिक कार्य
प्रमोद पाटील यांचे हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशन १९८६ पासून पन्हाळा - पावनखिंड मोहिमेचे आयोजन करते. लोकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन त्यांच्या या मार्गावरून तीन मोहिमांचे आयोजन केले आहे. ५ आणि ६ जुलैला एक टिम जाऊन आली. दुसरी टीम २०,२१ जुलैला निघणार आहे. तिसरी टीम २७, २८ जुलैला माहिमेवर जाणार आहे. हिल रायडर्सकडून मोहिमेतील मार्गावरील शाळांमध्ये संगणक देण्यात आले आहेत. १४ मुलींना दत्तक घेऊन त्यांचे १० ते १२चे शिक्षण केले जाते. या गावांमध्ये औषधांचे वाटपही करण्यात येते. मोहिमेच्या निमित्ताने त्यांनी एका सामाजिक कामाचा प्रारंभही केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com