पन्हाळा ठाण्यातील हवालदार दीड हजारांची लाच घेताना जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

आपटी - पन्हाळा पोलिस ठाण्याचे हवालदार सतीश बापूसाहेब खुटावळे (वय 53, रा. फुलेवाडी कोल्हापूर) याला दीड हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस ठाण्यातच पकडले. 

आपटी - पन्हाळा पोलिस ठाण्याचे हवालदार सतीश बापूसाहेब खुटावळे (वय 53, रा. फुलेवाडी कोल्हापूर) याला दीड हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस ठाण्यातच पकडले. 

या कारवाईबाबत विभागाने दिलेली माहिती अशी  तालुक्‍यातील बांदिवडे पैकी धनगरवाडा येथील तक्रारदार तुकाराम जानकर व त्याचे चुलते बंडा आप्पाजी जानकर यांचे किरकोळ भांडण झाले होते. त्याची तक्रार तुकाराम जानकर यांनी पन्हाळा ठाण्यात दिली; पण त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे तक्रारदार चौकशीसाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हवालदार खुटावळेची भेट घेतली. त्यावेळी त्याने जानकरांना तुमचा गुन्हा अदखलपात्र आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाईसाठी तीन हजारांची मागणी केली. त्यानंतर जानकर यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे 21 जून रोजी तक्रार केली होती. विभागाने तक्रारीची शहानिशा केली.

पडताळणीत खुटावळेने लाच मागितली व ती रक्कम लगेच घेवून येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत विभागाने तत्काळ पन्हाळा पोलिस ठाण्यात सापळा लावला. त्यावेळी जानकर व खुटावळे यांच्यामध्ये दीड हजारांवर सौदा ठरला. त्यानुसार खुटावळे पैसे घेतानाच विभागाने छापा टाकून शासकीय पंचांसमक्ष त्याला पकडले व पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. पोलिस उपाधीक्षक आदीनाथ बुधवंत, हवालदार मनोज खोत, पोलिस नाईक शरद पोरे, पोलिस नाईक नवनाथ कदम, कॉन्स्टेबल मयूर देसाई, सुरज अपराध यांनी भाग घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panhala Police station Hawaldar arrested in bribe case