पाणी पुरी, भेळ व्यवसायिकांचे जगणे झाले मुश्‍किल 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

सातच्या आत घरात असा आदेश देण्यात आल्यानंतर मात्र पाणी पुरी, भेळ, चायनीज, वडापाव, नूडल्स करणारे व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत.

बेळगाव: लॉकडाऊनचे नियम शिथिल करुन सर्व व्यवसाय सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असली तरी सातच्या आत घरात असा आदेश देण्यात आला आहे. यामुळे सात वाजल्यानंतर संपूर्ण शहरात शांतता दिसून येत आहे. सातच्या आत घरात असा आदेश देण्यात आल्यानंतर मात्र पाणी पुरी, भेळ, चायनीज, वडापाव, नूडल्स करणारे व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. हे व्यवसाय सात नंतरच सुरू होत असल्याने आमच्याकडे कोणीतरी बघा अशी आर्त हाक त्यांच्याकडून दिली जात आहे. 

शहरात व्यवसाय सुरू करण्यास प्रशासनाकडून सायंकाळी 7 पर्यंत परवानगी देण्यात आली असून त्यानंतर मात्र, दुकाने सक्तीने बंद केली जात आहेत. शहरात ठिकठिकाणी सायंकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत व्यवसाय करून आपला संसाराचा गाडा चालविणारे अनेक जण आहेत. मात्र, 7 नंतर व्यवसाय बंद होत असल्याने अडचणीत वाढ झाली आहे. राज्यस्थानी, युपी, बिहारी यांच्यासहीत शहरातील अनेक जण शहारात अंडा पॅटीस, भेळ, चिकन 65, चायनीज पदार्थ, वडापाव आदी व्यवसाय करतात, मात्र, व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी इतर व्यवसाय सुरु केले आहेत. 

शहरात धर्मवीर संभाजी चौक, एसपीएम रोड, शास्त्रीनगर, गोवावेस, बोगारवेस, चन्नमा सर्कल, कोल्हापूर सर्कल, शहरबसस्थानक, रेल्वे स्थानक आदी परिसरात हे व्यवसायिक आपला व्यवसाय करतात. दिवसाला 2 हजारांपासून ते 10 हजारांपर्यंत गल्ला होतो. यामधून त्यांचा घर खर्च चालतो. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे आम्हालाही व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

सात नंतरच व्यवसाय

लॉकडाउनमुळे प्रशासनाकडून कडक नियम लावण्यात आले आहेत, यामुळे आमच्यासारख्या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. सात नंतरच व्यवसाय होत असल्याने प्रशासनाने आमचा गांभीर्याने विचार करायला हवा. 
-रोहित यल्लाळ, व्यावसायिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pani Puri, Bhel traders Economic problems in belgaum