कोल्हापूर : दौलतनगरात गुंडाची दहशत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - दौलतनगरातील तीन बत्ती चौकात काल मध्यरात्री गुंडांनी घरांवर दगडफेक करत वाहने पेटवून दिली. यात दोन मोटारसायकल, रिक्षासह मोटारीचे मोठे नुकसान झाले. गुंडानी निर्माण केलेल्या या दहशतीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कोल्हापूर - दौलतनगरातील तीन बत्ती चौकात काल मध्यरात्री गुंडांनी घरांवर दगडफेक करत वाहने पेटवून दिली. यात दोन मोटारसायकल, रिक्षासह मोटारीचे मोठे नुकसान झाले. गुंडानी निर्माण केलेल्या या दहशतीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन गटात गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या या वादातून हा प्रकार घडला. याप्रकरणी चौघा संशयितांवर राजारामपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला. 

याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती, तीन बत्ती चौकात दोन गटात दांडीया खेळण्याच्या कारणावरून वाद झाला. याच वादातून महिलांची छेड काढल्याप्रकरणी काही जणांवर राजारामपुरी पोलिसात गुन्हेही दाखल झाले. यातून दोन गटातील वाद अधिकच चिघळला होता. गेल्या तीन ते चार दिवसापासून या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काल रात्री येथे दांडीयाचा कार्यक्रम सुरू होता. मात्र कोणाच्याही अध्यात मध्यात नसणारे नागरिक रात्री आपाआपल्या घरी झोपले होते.

रात्री उशिरा दांडीयाचा कार्यक्रम संपला.त्यानंतर गुंडांनी येथील वाहनांची तोडफोड करत वाहनांवर पेट्रोल टाकून ती पेटवून देण्यास सुरवात केली. यात धोंडीराम गंगाराम चव्हाण यांची पेटवून देलेल्या मोपेडच्या आगीचे लोट पाहून शेजारील जागे झाले. त्यांनी याची माहिती चव्हाण यांना दिली. ते तात्काळ घराबाहेर आले. त्यांनी पाण्याच्या सहायाने या आगीवर नियंत्रण मिळवले. पण त्याच ठिकाणी रस्त्याकडेला लावलेली सुरेश वसंतराव चव्हाण यांची मोटारसायकलसह मंडळाचा फलकही पेटवल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. त्यापूर्वी गुंडांनी विशाल बसवंत मिलगीडी यांच्या मोटारीची आणि सागर पांडुरंग साळवी यांच्या रिक्षाचीही तोडफोड करत काही घरांवर दगड बाटल्या फेकल्या होत्या. 

तीन बत्ती चौकात वाहनांची तोडफोड करण्याचे आणि वाहने पेटवून देण्याचे प्रकार वारंवार घडतात. मात्र संबधित गुंडावर कडक कारवाई केली जात नाही. अशा संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात होत्या.

दरम्यान याप्रकरणी सुरेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित महेश चंद्रकांत दिंडलकुप्पे ऊर्फ पप्या (वय 30, रा. दौलतनगर) व त्याचे तीन साथिदारांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान सोमवारी (ता. 7) रात्री तीन बत्ती चौकात महिलांची छेड काढल्याप्रकरणी पिडीत महिलांनी दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित महेश दिंडुलकुप्पे ऊर्फ पप्पू, अतिश चव्हाण, अनिकेत धोत्रे, विशाल गाडीवर, राहूल कलगुटगा, शुभम गाडीवर, प्रकाश मळगेकर (सर्व रा. तीन बत्ती चौक) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी सांगितले. 

सामान्यांना कोणी वालीच नाही... 
तीन बत्ती चौक परिसरात हाणामारी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ हा भाग नित्याचा भाग बनला आहे. तत्कालिन पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या काळात हा भाग अत्यंत शांत होता. मात्र त्यांच्या बदलनीनंतर पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. आम्हा सामान्यांना आता कोणी वालीच उरला नाही अशा प्रतिक्रिया परिसरातून नागरिकांतून उमटत होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panic terror in Kolhapur Daulat Nagar