Anil Babar : तालुक्यावरील दुष्काळाचा कलंक मिटवण्याची प्रतिज्ञा तडीस नेणारा ‘पाणी’दार राजकारणी

सध्याच्या राजकारणात ‘मनी-मसल पॉवर’चा प्रभाव वाढतो आहे. विकास आणि सामान्य माणसांचं जगणं सुकर करण्याच्या दृष्टीने राजकीय मांडणी होताना फारशी दिसत नाही. या पद्धतीच्या राजकीय मुशीत आमदार अनिल बाबर तयार झाले.
MLA anil babar death
MLA anil babar deathesakal

एक काळ आपल्या माथ्यावर दुष्काळाचा शाप घेऊन पाण्यासाठी वणवण करणारा तालुका म्हणजे खानापूर, आटपाडी. या तालुक्यांवरील दुष्काळाचा कलंक मिटवून ‘पाणी’दार करण्याची प्रतिज्ञा करणारा व ती तडीस नेण्यासाठी सारी हयात पणाला लावणारा नेता म्हणजे अनिलभाऊ.

- शेखर जोशी

सध्याच्या राजकारणात ‘मनी-मसल पॉवर’चा प्रभाव वाढतो आहे. विकास आणि सामान्य माणसांचं जगणं सुकर करण्याच्या दृष्टीने राजकीय मांडणी होताना फारशी दिसत नाही. या पद्धतीच्या राजकीय मुशीत आमदार अनिल बाबर तयार झाले.

त्यांच्यासारखी सभ्य व अभ्यासू माणसं आता कमी आहेत. अनिलभाऊंनी चार टर्म आमदारकी केली. ग्रामपंचायत ते विधानसभा असा प्रवास करताना लोकहित केंद्रस्थानी ठेवले. अनिलभाऊंची प्रशासनावर प्रचंड पकड होती.

गार्डी गावचे सरपंच, खानापूरचे पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सभापती, आमदार हा प्रवास म्हणजे प्रचंड अभ्यासच होता. त्यामुळे ते कोणताही विषय खोलवर मांडत. त्यांचा मंत्रिपदावर अग्रक्रमाने हक्क होता, असे सारेच म्हणतात.

मात्र ते स्वप्न पूर्ण झाले नाही, ही हुरहूर त्यांच्या कार्यकर्त्यांना कायम राहील. भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांचं सरकार आल्यानंतर अनिलभाऊ मंत्री... अगदी पालकमंत्री होतील, अशी अपेक्षा होती. त्यांच्यासारखा अभ्यासू नेता पालकमंत्री झाला असता तर चांगलं काम उभं राहिलं असतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील ही हुरहूर राहील.

शिवसेना फुटली. त्यात अनिलभाऊ आघाडीवर होते. त्यांच्यावर टीकेची झोड उठली. जिल्ह्यातूनही आरोप झाले. ते गुवाहाटीत होते. एक दिवस मला फोन आला. ते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत का गेले, याचे विश्‍लेषण त्यांनी केले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही माझी बाजू मांडा, अगर मांडू नका; पण माझी भूमिका काय आहे, तुम्हाला कळली पाहिजे म्हणून मी फोन केला.’’

अनिलभाऊ विचारपूर्वक निर्णय घेत. त्यांची राजकीय दूरदृष्टी नेहमीच पाहायला मिळाली. जिल्ह्यातील राजकारणात ते आर. आर. पाटील यांच्या जवळचे होते. त्याचा राष्ट्रवादीत काम करताना थोडा फटकादेखील त्यांना बसला.

दोनवेळा बंडखोरी केली; मात्र गणित जमत नसल्याने अखेर शिवसेनेचा मार्ग धरला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या; मात्र तो निर्णय सार्थ ठरवून दाखवला. टेंभू योजना हे त्यांचे स्वप्न होते. ते त्यांनी पूर्णत्वास नेले.

आम्ही विट्यात गेलो ते भेटायचे. विकासावर भरभरून बोलायचे. टेंभू सिंचन योजना हा विषय नेहमीच केंद्रस्थानी असायचा. कवलापूर विमानतळाचा विषय त्यांनी उचलून धरला. ‘सकाळ’ने जी भूमिका घेतली, तिला साथ दिली.

सांगली शहर हे जिल्ह्याचे केंद्र, म्हणून प्रत्येक तालुक्यातून चांगले रस्ते या शहराला जोडले पाहिजेत, ही त्यांची भूमिका होती. सहसा ते राजकीय कुरघोड्यांवर बोलायला उत्सुक नसायचे. आरोपांना संयम राखून उत्तर द्यायचे.

लोक केंद्रस्थानी ठेवून त्यांनी काम केले. जुन्या राजकीय पिढीकडून त्यांना हा वारसा मिळाला. त्या पिढीतील आजचे ते शिलेदार होते. जिल्ह्यातील राजकारणात गेल्या दहा वर्षांत आर. आर. पाटील, पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, संभाजी पवार असे तळागाळातून आलेले दिग्गज नेते काळाने हिरावून घेतले. त्या परंपरेतील एक नाव अनिलभाऊंचे होते.

दुष्काळमुक्तीसाठी अविरत झटणारा नेता

आमदार अनिल बाबर हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक होते. त्यांच्याबद्दल सर्व क्षेत्रांतील लोकांना आदर होता. हा आमदार कमी बोलून, जास्त काम करायचा. बऱ्याच वेळा आमचा संघर्ष व्हायचा, वादविवाद व्हायचा; पण प्रेम कमी झालं नाही.

माझं गाव पेड हे विसापूर गटात असल्याने खानापूर मतदार संघात होते. त्यामुळे भाऊ, ‘तुम्ही माझे मतदार आहात,’ असं म्हणायचे. त्यांच्या वाढदिवसाला विट्यात जाऊन शुभेच्छा दिल्या, भेटलो. मात्र आज ही वेळ येईल, असे वाटले नाही. सतत कामात राहणारा हा माणूस होता. दुष्काळमुक्तीसाठी ते आयुष्यभर झटला. त्यांची नेहमीच उणीव भासत राहील.

- पालकमंत्री सुरेश खाडे

अनिल बाबर यांचे कार्य कधीच विसरता येणार नाही

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी साथ देणारे माझे सहकारी अनिलभाऊ बाबर यांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले आहे. बाबर कुटुंबीय मोठ्या दुःखातून जात आहे.

राष्ट्रवादीतर्फे मी सहवेदना व्यक्त करतो. जिल्ह्यात आम्ही अनेक वर्षे एकत्रित काम केले. खानापूर, आटपाडी या भागातील दुष्काळ संपावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मी राज्याचा अर्थमंत्री असताना अनिलभाऊंची टेंभू योजनेसाठी पाठपुरावा करण्याची पद्धत, त्यांच्या कामाची पद्धत मी अनुभवली. त्यांनी लोकांसाठी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही.

- आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सामान्य माणसाचा आधार

दुष्काळी खानापूर, आटपाडी तालुक्यांच्या विकासासाठी सतत कार्यमग्न असणारा, टेंभू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाचा भाग्योदय व्हावा, म्हणून अविरत झटणारा एक ज्येष्ठ नेता आपण गमावला आहे.

ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. राजकारण एका बाजूला आणि विकासाचा दृष्टिकोन दुसऱ्या बाजूला ठेवून ते काम करत होते. टेंभू योजनेला गती देताना आम्ही एकविचाराने काम केले. त्यात मोठे यश आले. भविष्यात दुष्काळी प्रश्‍नांना भिडताना अनिलभाऊंसारख्या अनुभवी माणसाची पोकळी जाणवत राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

- खासदार संजय पाटील

उत्तम सहकारी हरपला

अनिलभाऊ आणि मी १९८९ ला एकत्र जिल्हा परिषद सदस्य झालो. एकत्र सभापती झालो. मी शिक्षण व भाऊ बांधकाम सभापती झाले. अडीच वर्षे चांगले काम केले. भाड्याच्या इमारतीत आम्ही एकत्र राहत होतो. दुष्काळी प्रश्‍नांवर त्यांनी प्रभावी काम केले.

मी जिल्हा परिषद अध्यक्ष व ते आमदार झाले. एकत्र काम करता आले. अत्यंत अभ्यासू नेता होता. ग्रामीण प्रश्‍नांची त्यांना उत्तम जाण होती. टेंभू योजनेचा ध्यास घेऊन त्यांनी काम केले. अधिक क्षेत्र पाण्याखाली यावे म्हणून त्यांनी संघर्ष केला. त्यांना कशाचाही अहंकार नव्हता. सर्वांना सामावून घेत काम करायचे. एक उत्तम सहकारी, कणखर नेता हरपल्याचे दुःख आहे.

- शिवाजीराव नाईक, माजी आमदार

शेतकरीहितासाठी आयुष्य वेचले

दुष्काळी भागाचा कायापालट करायचा असेल तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. ते पूर्ण करण्यासाठी शेतीला कायमस्वरुपी पाणी मिळवण्यासाठी संघर्ष केला. टेंभू योजनेचे ते जनक ठरले. सांगली जिल्हा बॅंकेचे ते सन २००७ पासून संचालक होते. त्यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना होत असे. शेतकरीहिताच्या निर्णयासाठी ते नेहमीच आग्रही असत.

- आमदार मानसिंगराव नाईक

कर्तव्यदक्ष राजकारणी

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा घेऊन खानापूर, आटपाडी सारख्या दुष्काळी तालुक्यांमध्ये अनिलभाऊंनी प्रचंड विकासकामे केली. वसंतदादा, विष्णुअण्णा, प्रकाशबापू आणि मदनभाऊंसमवेत सतत राजकीय प्रवाहात त्यांनी सहकार, उद्योग व शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी घेतली. दादा कुटुंबाला अडचणीच्या काळात आधार दिला. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, सज्जन राजकीय नेता आपण गमावला आहे.

- माजी मंत्री प्रतीक पाटील

स्वकर्तृत्वावर यश

आमदार अनिल बाबर यांचे निधन धक्कादायक आहे. गार्डी गावचे सरपंच ते आमदार हा एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीचा प्रवास केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर झाला. सिंचन योजनांवर ते नेहमी आग्रही भूमिका मांडायचे. त्यांनी विकासात्मक राजकारण केले. राजकीय संघर्षात कधीही आम्ही कौटुंबिक पातळीवर टीका केली नाही. आमची विकासात स्पर्धा राहिली. तरुणांना मार्गदर्शनासाठी त्यांची गरज होती.

- माजी आमदार सदाशिवराव पाटील

आधार हरपला

आर. आर. आबांचे आणि अनिलभाऊंचे राजकारण एका वेळी सुरू झाले. सामान्य माणूस हा केंद्रस्थानी ठेवून दोघांनी काम केले. आमच्या कुटुंबासाठी हा दुसरा मोठा धक्का आहे. आमदार अनिलभाऊ हे सर्वसामान्यांचे नेते होते. पाण्यासाठी त्यांनी दीर्घ संघर्ष केला. खानापूर, आटपाडी तालुक्याचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अखेरपर्यंत त्यांनी जिव्हाळा जपला. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

- आमदार सुमन पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com