पानसरे यांच्या स्मारक आराखड्याचे सादरीकरण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात करण्यात आले. सुमारे 20 लाख रुपये खर्चाच्या या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना महापौर अश्‍विनी रामाणे यांनी या बैठकीत दिल्या. पानसरे यांच्या संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब या स्मारकात उमटणार आहे. पानसरे यांच्या पुरोगामी विचारातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. 

गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी महापालिकेने शास्त्रीनगर, सागरमाळ परिसरातील वि. स. खांडेकर शाळेजवळ 30 बाय 35 फुटांची जागा दिली आहे. या स्मारकाचा आराखडा विनामोबदला तयार करण्याची जबाबदारी आर्किटेक्‍ट राजेंद्र सावंत यांनी पार पाडली आहे. बैठकीच्या सुरवातीलाच त्यांनी या आराखड्याचे सादरीकरण केले. ते म्हणाले, ""15 बाय 21 फुटांमध्ये शिल्पाची रचना करण्यात येईल. शिल्पाच्या दोन्ही बाजूला मोकळी जागा, लॅन्डस्केपिंग करून सुशोभीकरण, पिलरची रचना पेनच्या आकारात ठेवली आहे. छोट्या लॉनची रचना, लाइट इफेक्‍ट आदींचा यात समावेश आहे. या आराखड्यामध्ये स्मारक हे तिन्ही बाजूने पाहता येईल, असे नियोजन केले आहे. तसेच बांधकाम संपूर्ण जर्मन टेक्‍नॉलॉजीमध्ये करण्यात येणार आहे. ते रंगमिश्रित असल्याने त्याला वेगळा रंग देण्याची आवश्‍यकता नाही. रस्त्यापासून 15 फूट उंचीचे शिल्प असेल. पानसरे यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती भावी पिढीला व्हावी, त्यातून प्रेरणा घ्यावी, असा त्याचा उद्देश आहे. 

स्मिता पानसरे यांनी तरुण पिढीला पुरोगामी विचारांची माहिती व्हावी, यासाठी येथे एक अभ्यासिका असावी, अशी सूचना केली. तर मेघा बुट्टे पानसरे यांनी स्मारक पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी येथे बैठक व्यवस्थाही असावी, अशी सूचना केली. सतीशचंद्र कांबळे यांनी या स्मारकाच्या जागेलगत ट्रान्स्फॉर्मरचा अडथळा आहे तो दूर करा, असे मत मांडले. या वेळी नगरसेवक भूपाल शेटे, अशोक जाधव, मेघा पानसरे, चंद्रकांत यादव, माजी महापौर आर. के. पोवार, दिलीप पोवार यांनी सूचना मांडल्या. 
 
महापौर अश्‍विनी रामाणे यांनी या स्मारकाचे काम चांगल्या दर्जाचे व लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी सूचना केली. या बैठकीस उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, गटनेता शारंगधर देशमुख, सुनील पाटील, नगरसेविका सूरमंजिरी लाटकर, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, अनिल चव्हाण, बी. एल. बरगे, नामदेव गावडे, बाबा यादव, महादेव आवटे, कबीर पानसरे, सुशीला यादव, मुकुंद कदम, रूपाली कदम आदी उपस्थित होते. 

Web Title: Pansare presentation of the memorial plan