कागदाच्या दोन्ही बाजू वापरा

शीतलकुमार कांबळे
बुधवार, 11 जानेवारी 2017

सोलापूर - सत्रकामासाठी एक हजार 710 विद्यार्थी 10 लाख 26 हजार कागदांचा वापर करतात. जर या विद्यार्थ्यांनी कागदाचा दोन्ही बाजूंचा वापर केल्यास चार लाख दहा हजार कागदांची बचत होऊ शकते. म्हणूनच पर्यावरणसंवर्धनाचा विचार करून तंत्रशिक्षण कार्यालयाने राज्यातील सर्व महाविद्यालयांना कागदाचा दोन्ही बाजूने वापर करण्याचा आदेश दिला आहे.

कागदाचा काटकसरीने वापर केल्यास पर्यावरण व ऊर्जा वाचविण्यास मदत मिळणार आहे. याचा विचार करून विद्यार्थ्यांचे प्रकल्प अहवाल कागदाच्या दोन्ही बाजूंनी छापावा, अशा सक्त सूचना राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिल्या आहेत. या संदर्भात औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कागदाचा काटकसरीने वापर करून पाणी आणि ऊर्जा वाचविण्यात संदर्भात सर्वेक्षण केले होते. त्यानुसार राज्य पातळीवर 99.36 दशलक्ष कागदांची बचत होऊ शकते. यामुळे प्रदूषणातही घट होऊ शकते, असा निष्कर्ष निघाला आहे.

अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, प्रकल्प, परिषद यांचे अहवाल तयार करावे लागतात. यासाठी कागदाच्या एका बाजूचाच वापर केला जातो. यामुळे दुसरी बाजू वापराविना राहते. या दुसऱ्या बाजूचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. याचा विचार करून महाविद्यालये, तंत्रनिकेतने यांना सर्व प्रकारचे अहवालांची कागदाच्या दोन्ही बाजूने छपाई करण्यास सांगितले आहे. सोलापूर विद्यापीठानेही तंत्रशिक्षण कार्यालयाच्या सूचनेनुसार संलग्न सर्व महाविद्यालयांना या आदेशानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तंत्रशिक्षण कार्यालयाने पर्यावरण संवर्धनाचा उद्देश समोर ठेवून चांगला निर्णय घेतला आहे. कागदाच्या दोन्ही बाजू वापरल्यास मोठ्या प्रमाणात वृक्ष वाचतील. या निर्णयाची महाविद्यालयातील विद्यार्थी नक्कीच अंमलबजावणी करतील.
- प्रा. डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय

Web Title: paper both side use