विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा घोळ; उत्तरपत्रिका अर्धवट तपासली

तात्या लांडगे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सोलापूर विद्यापीठाच्या गतवर्षीच्या परीक्षा निकालातील त्रुटी आता समोर येऊ लागल्या आहेत. मागच्या वर्षी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात वालचंद महाविद्यालयात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याची गुणपत्रिका अर्धवटच तपासली आणि फेरतपासणी केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचे नऊ गुण वाढले, मात्र एका गुणाने तो नापास झाला. याची माहिती त्या विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर "सकाळ'ला दिली.

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या गतवर्षीच्या परीक्षा निकालातील त्रुटी आता समोर येऊ लागल्या आहेत. मागच्या वर्षी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात वालचंद महाविद्यालयात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याची गुणपत्रिका अर्धवटच तपासली आणि फेरतपासणी केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचे नऊ गुण वाढले, मात्र एका गुणाने तो नापास झाला. याची माहिती त्या विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर "सकाळ'ला दिली.

त्यामुळे पुन्हा विद्यापीठाचा परीक्षा विभाग चर्चेत आला आहे. परीक्षा विभागाच्या चुका, गुणपत्रिकेवरील त्रुटी यासह अन्य कामांतील त्रुटींमुळे सदैव चर्चेत असलेल्या सोलापूर विद्यापीठाचा ऑनलाइन अन्‌ 30 दिवसांच्या आत निकाल लावण्यात यशस्वी ठरल्याने राज्यभरात गवगवा झाला. परंतु, मागील वर्षीच्या निकालात त्रुटी असल्याचे आता उघड होत आहे. या वर्षी जिल्ह्यातील सात हजार 225 विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीची मागणी केली आहे. तसेच, त्यातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना शंका असल्याने उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीची मागणी केली आहे.

बहुतांश विद्यार्थ्यांना गुण वाढण्याची अपेक्षा असूनही त्यांच्या नशिबी निराशाच येते. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाइन अथवा एखाद्या बाबतीत अग्रेसर होण्याऐवजी व नावलौकिक मिळण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे. 

फोटोकॉपींतून 36 लाखांची कमाई 
अभियांत्रिकी (4,977), विज्ञान शाखा (1,656), लॉ (204), कला (230), फार्मसी (130), शिक्षणशास्त्र (28) अशाप्रकारे सात हजार 225 विद्यार्थ्यांनी 36 लाख 12 हजार 500 रुपये भरून उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपींची मागणी केली आहे. यापैकी तब्बल साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. 

दरवर्षी अभियांत्रिकी, फार्मसी, शिक्षणशास्त्र, कला, लॉ आणि विज्ञान शाखेतील सुमारे सहा-साडेसहा हजार विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागविली जाते. याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. - डॉ. धवल कुलकर्णी, परीक्षा नियंत्रक

Web Title: paper checking problem in university Exam board