जिल्ह्यात मान्यवरांच्या तोफा धडाडणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

सातारा - पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाने भरगच्च सभांचे नियोजन केले आहे. या सभांसाठी आगामी दोन आठवड्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे नेते प्रचारात सहभागी होऊन टिकेची तोफ डागणार आहेत. कॉंग्रेसची धुरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे सांभाळणार आहेत. 
 

सातारा - पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाने भरगच्च सभांचे नियोजन केले आहे. या सभांसाठी आगामी दोन आठवड्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे नेते प्रचारात सहभागी होऊन टिकेची तोफ डागणार आहेत. कॉंग्रेसची धुरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे सांभाळणार आहेत. 
 
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी विरोधात कॉंग्रेसच्या बरोबरीने भारतीय जनता पक्ष, शिवसेनेने आघाडी घेतली आहे. प्रत्येक पक्षाचे अधिकृत उमेदवार अंतिम झाले आहेत. काही ठिकाणी बंडखोरी होणार, पण पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी आगामी दोन आठवड्यांत राष्ट्रवादी व भाजपकडून मोठ्या नेत्यांच्या सभांचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादीने 25 तर भाजपने 20 सभांचे नियोजन केले आहे. या सभांसाठी जिल्ह्यात भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. त्यांच्या माण व कऱ्हाड तालुक्‍यांत दोन सभा होतील. त्यासोबतच पुण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री राम शिंदे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रत्येक तालुक्‍यात एक, दोन सभा होतील. 

राष्ट्रवादीने 25 सभांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर, पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. या सभा मल्हारपेठ, पाटण, विंग, रेठरे बुद्रुक, काले, पळशी, गोंदवले, वाठार किरोली, पुसेसावळी, मसूर, उंब्रज, तारळे, नागठाणे, अपशिंगे, सातारारोड, वाठार स्टेशन, देऊर, कुडाळ, केळघर, कोडोली, शिवथर, पुसेगाव, मायणी, पाचवड, शिरवळ येथे होतील. 

कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे हेच प्रचार सभा घेणार असून त्यांच्यासोबत राजेंद्र मुळुक हे सहभागी होतील. ऐनवेळी प्रदेश कॉंग्रेसकडून काही नेत्यांना जिल्ह्यात सभा घेण्यासाठी पाठविले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष  आमदार आनंदराव पाटील यांनी सांगितले. शिवसेनेकडून पालकमंत्री विजय शिवतारेंसह उपनेते सूर्यकांत महाडिक, आदेश बांदेकर, गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे- पाटील यांच्यासह काही मंत्रीही प्रचारसभांसाठी येण्याची शक्‍यता आहे. 

उदयनराजे अकेला काफी... 

सातारा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी "राष्ट्रवादी'चे खासदार उदयनराजे भोसले हे एकटेच तालुक्‍यातील सर्व प्रचारसभा घेणार आहेत. प्रत्येक पक्षांकडून दिग्गज नेते प्रचारासाठी येणार असतानाच दुसरीकडे एकटे उदयनराजे या सर्वांच्या तोडीस तोड सभा घेऊन वातावरण निर्मिती करणार आहेत.

Web Title: Party planning meetings for the promotion