esakal | इनामदार, देशपांडे, महाडिकांवर पक्षाची जबाबदारी; भाजप प्रदेश कार्यकारिणी निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Party responsibility on Inamdar, Deshpande, Mahadik; BJP state executive selection

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झालेले नगरसेवक शेखर इनामदार यांच्यावर 22 महापालिकांची जबाबदारी देण्यात आली आहे.

इनामदार, देशपांडे, महाडिकांवर पक्षाची जबाबदारी; भाजप प्रदेश कार्यकारिणी निवड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झालेले नगरसेवक शेखर इनामदार यांच्यावर 22 महापालिकांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांच्याकडे पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. याचबरोबर नगरसेविका भारती दिगडे, सम्राट महाडीक तसेच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सत्यजित देशमुख यांनाही प्रदेश कार्यकारिणीवर संधी देण्यात आली आहे. 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या प्रदेश कार्यकारीणीची निवड काल (शुक्रवारी) जाहीर केली. गतवेळी उपाध्यक्षपदी असलेले नगरसेवक शेखर इनामदार यांना कार्यकारिणी सदस्य म्हणून राज्यातील नागरीभागात म्हणजेच महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात भाजपाची ताकद वाढवण्याची जबाबदारी दिली आहे. राज्यातील क व ड महापालिकांचा कारभार लोकाभिमुख व्हावा, नागरी समस्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून विकास करावा यासाठी प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांच्यावर पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून रवि अनासपुरे यांच्याबरोबर पक्षवाढीची जबाबदारी दिली आहे. देशपांडे यांनी संघटना बांधणी व निवडणूक रणनीती यासाठी अनेक राज्यात पक्षाचे काम केले आहे. त्यांच्याबरोबरच गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करुन भाजपमध्ये आलेले वाळवा तालुक्‍यातील युवा नेते सम्राट महाडिक यांच्यावरही पक्षवाढीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. 

भाजपाच्या नगरसेविका भारती दिगडे यांनाही प्रदेश कार्यकारिणीवर संधी दिली आहे. तसेच कॉंग्रेसमधून आलेले सत्यजित देशमुख यांचीही प्रदेश कार्यकारिणीवर निवड केली आहे. माजी प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांच्यासह निमंत्रित सदस्य पांडूरंग कोरे यांना संधी मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार सुरेश खाडे, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची निवड करण्यात आली. 

जिल्ह्यात विधानसभेच्या दोन जागा गमवाव्या लागल्यानंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी किमान राज्यस्तरीय पद देण्याची गरज होती. मात्र तसे पद दिलेले नाही. राज्यातही भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेते, कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.