Paschim Maharashtra: शॉर्टसर्किटने अडीच एकरातील ऊस खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शॉर्टसर्किटने अडीच एकरातील ऊस खाक

बेडकिहाळ : शॉर्टसर्किटने अडीच एकरातील ऊस खाक

बेडकिहाळ : भोज क्रॉसपासून पश्चिमेस भोज मार्गावरील प्रगतशिल शेतकरी अक्षय आलगुरे, अभिनंदन अलगुरे, अविनाश अलगुरे यांच्या सर्व्हे नंबर १७१/२ मधील दोन एकर क्षेत्रातील ऊस व ठिबक सिंचन साहित्य तर याच क्षेत्रातील विजयकुमार अलगुरे यांचा अर्धा एकर क्षेत्रातील ऊस विद्युत वाहिन्यांच्या तारा लोंबकळून तुटून पडल्याने खाक झाला. आगीच्या ठिणग्या पडून अडीच एकरातील ऊस व ड्रीपचे साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (ता. १५) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दरम्यान घडली. या क्षेत्रात २०१८, २०२० व २०२१ अशा तीन वर्षी हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे उसाला आग लागून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, यंदा उसासह ठिबक सिंचन साहित्यही जळाल्याने लाखो रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱयांना बसला आहे. या संदर्भात यापूर्वी आलगुरे बंधूनी सदलगा हेस्कॉम विभागाला तक्रार करून नुकसान भरपाईची मागणीही केली होती. त्यांना भरपाई तर मिळालीच नाही, शिवाय लोंबकळणारया वीज वाहिन्याही तशाच राहिल्या. या क्षेत्रातील हा ऊस शिरोळमधील दत्त साखर कारखान्यास नोंद केला होता. महिन्याभरात उसाला तोड येणार होती. सकाळी आग लागल्याचे समजताच या परिसरातील शेतकरी एकत्रित आले. आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टाळला.

हेही वाचा: रात्रीच्या ध्वनी प्रदूषणात नागपूरचा आघाडीच्या दहा शहरात समावेश

सदलगा अग्नीशामक दलाच्या जवानांही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. हेस्कॉम अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आलगुरे बंधूनी केली आहे.

आतातरी तक्रार घेणार का?

यंदा ऑक्टोबर १७ पासून बेडकिहाळ परिसरात उसाच्या फडाला आग लागून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची ही तिसरी घटना आहे. यातील बेडकिहाळ येथील खोत मळ्यातील पाच एकर व आलगुरे मळ्यातील अडीच एकर उस जळाल्याच्या घटना विद्युत तारेंच्या स्पर्शामुळे घडल्या आहेत. हेस्कॉमचे अधिकारी तक्रारींची दखल आता तरी घेणार का? असा प्रश्न ऊस जळालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे.

loading image
go to top