मिरज-कोल्हापूर मार्गावर डेमू पॅसेंजरमध्ये प्रवाशांची घुसमट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

मिरज - मध्य रेल्वेने मिरज-कोल्हापूर-पुणे मार्गावर डेमू लोकल रेल्वे देऊन प्रवाशांची चांगलीच गोची केली आहे. डब्यांची कमी संख्या आणि बसण्यासाठी अपुरी आसनव्यवस्था यामुळे प्रवाशांत दररोज हाणामाऱ्या होताहेत. आज सकाळी मिरजेतून सुटलेल्या डेमू गाडीत पाय ठेवायला देखील जागा नव्हती. 

मिरज - मध्य रेल्वेने मिरज-कोल्हापूर-पुणे मार्गार्वर डेमू लोकल रेल्वे देऊन प्रवाशांची चांगलीच गोची केली आहे. डब्यांची कमी संख्या आणि बसण्यासाठी अपुरी आसनव्यवस्था यामुळे प्रवाशांत दररोज हाणामाऱ्या होताहेत. आज सकाळी मिरजेतून सुटलेल्या डेमू गाडीत पाय ठेवायला देखील जागा नव्हती. 

सुमारे दोन हजारांहून अधिक प्रवाशांसाठी या गाडीला फक्त आठ डबे आहेत. प्रत्येक डब्यात बसायला कमी आणि उभे रहायलाच जास्त जागा अशी स्थिती आहे. जुन्या पारंपरिक पॅसेंजर रेल्वेत बसण्यासाठी भरपूर आसने होती. एका डब्यात 72 आसनसंख्या असली तरी एका आसनावर पाचजणांना बसता यायचे शिवाय लगेज ठेवण्यासाठीच्या बाकड्यांवरही प्रवासी बसायचे. डेमू गाडीत ही सोय नाही. लगेजसाठी छोटे कॅरेज असून त्यावर बसता येत नाही. मुंबईतील प्रवाशांना उभे राहता यावे म्हणून डिझाईन केलेल्या डब्यांत बसण्यासाठी खूपच कमी आसने आहेत. त्यावर मोजक्‍याच प्रवाशांना बसता येते. उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी छताची हॅंडल खूपच उंचीवर आहेत. कमी उंचीच्या प्रवाशांना ती पकडता येत नाहीत. महिला, वृद्धांचेही अतोनात हाल होतात.

आज सकाळी मिरजेतून सुटलेली डेमू पॅसेंजर खचाखच भरलेली होती. गर्दी ओलांडून शौचालयात जाणेही मुश्‍कील ठरले. जयसिंगपूर, हातकणंगले आणि रुकडीमध्ये या गर्दीत प्रचंड भर पडली. आज शुक्रवार असल्याने कोल्हापूरला महालक्ष्मीला जाणाऱ्या महिलांची संख्या मोठी होती. गर्दीमुळे त्यांची पुरेवाट झाली.

रात्रीच्यावेळीही डेमूच्या डब्यात दिवे बंद असल्याची तक्रार वारंवार होते. पुणे विभागाने जुन्या गाडीचे डबे वाढवण्याऐवजी कमी डब्यांची डेमू देऊन सातारा, सांगली व कोल्हापूरच्या प्रवाशांची जणू चेष्टाच केली आहे. या गाडीला डबे वाढवावेत किंवा जुनी गाडीच सोडावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. 

Web Title: Passanger rush in Demu Local train