माणुसकी मेली.. असं काय घडलं त्या एसटी बसमध्ये

 Passenger death on ST bus
Passenger death on ST bus

संगमनेर ः एसटी बसचा तो शेवटचा थांबा होता. सारे प्रवासी उतरून गेले. मात्र, एक प्रवासी बसमध्येच राहिला. त्याला उतरायला सांगूनही तो ऐकत नव्हता. तो निश्‍चल होता. बसच्या वाहकाने "दारू प्यायलेला आहे, मदत करा' म्हणत ग्रामस्थांच्या मदतीने हात-पाय धरून त्याला बसबाहेर ठेवून दिले. पुढच्याच क्षणी बस भरधाव निघूनही गेली.

आश्वी बुद्रुकमध्ये घडलं..

पण त्या प्रवाशाची काहीच हालचाल दिसेना, म्हणून ग्रामस्थांनी पाहिले, तर त्याचा मृत्यू झालेला होता... नजरेआड जात असलेल्या भरधाव बसकडे पाहून ग्रामस्थ म्हणत होते... "माणुसकीच मेली हो..!' तालुक्‍यातील आश्वी बुद्रुक येथे आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

श्रीरामपूर आगाराची बस
त्याचे असे झाले... श्रीरामपूर आगाराची श्रीरामपूर-आश्वी ही बस सकाळी अकराच्या सुमारास आश्वी बुद्रुक येथे आली. सारे प्रवासी उतरून गेले. परत जाण्यासाठी बस वळली, त्या वेळी वाहकाला बसमध्ये एक प्रवासी निश्‍चल अवस्थेत आढळला. त्याने गावातील काही युवकांच्या मदतीने, "ही व्यक्ती दारू प्यायलेली आहे,' असे सांगत, हात-पाय धरून खाली टाकून बस वेगाने दामटली.

तो मृतदेह होता

काही वेळानंतर त्या व्यक्तीची हालचाल न दिसल्याने, त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. "तो मेलाय, हे त्या वाहकाला माहीत असणार, म्हणूनच त्याने बस दामटली', "माणुसकीच मेली हो' अशा संतप्त प्रतिक्रिया तेथे व्यक्त करण्यात आल्या. कोतवाल सोमनाथ गाडेकर यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी तेथे जाऊन पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात पाठवला. 

नगरमधील आहे रहिवासी

तपासाअंती त्या मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण बाबूराव जाधव (वय 60, मूळ रा. दरेवाडी, ता. नगर) असे असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मागे कोणी नसल्याने ते दाढ बुद्रुक (ता. राहाता) येथील नातलगांकडे अधूनमधून राहत असल्याचे आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असल्याचे समजले.

शवविच्छेदनानंतर कळेल..

शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे कारण व वेळ समजणार आहे. मात्र, खोटे कारण सांगून, पोलिसांना माहिती न देता, गजबजलेल्या बसथांबा परिसरात, मृतदेह एसटीबाहेर काढून साळसूदपणे निघून गेलेल्या चालक-वाहकाच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कृत्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली.

दरम्यान, आश्‍वी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com