रात्री जादा भाड्यामुळे प्रवासी एसटीपासून दुरावला

शिवाजी यादव
बुधवार, 19 एप्रिल 2017

लांब पल्ल्याच्या आठ गाड्या बंद - खासगी गाड्यांपेक्षा पन्नास ते शंभर रुपयांचा फरक

लांब पल्ल्याच्या आठ गाड्या बंद - खासगी गाड्यांपेक्षा पन्नास ते शंभर रुपयांचा फरक

कोल्हापूर - एसटी महामंडळाच्या काही गाड्यांना दिवसाचे भाडे कमी व रात्रीचे जास्त अशी गंमतशीर तफावत आहे. एका प्रवाशाला पाच ते तीस रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो, तर कोल्हापुरातून पुण्याला जायचे झाल्यास खासगी गाडीला दोनशे, अडीचशे, तीनशे रुपये, तर एसटी महामंडळाला तीनशे रुपयांपेक्षा जास्त भाडे आहे. तेथे पन्नास ते शंभर रुपयांचा भाड्यापोटी फरक असेल, तर एसटीने चांगल्या सुविधांचा कितीही दावा केला तरी बहुतेक प्रवासी खासगी गाड्यांकडे वळत आहेत, अशी भाडेवाढ व रात्रराणी गाडीचे जादा भाडे यामुळे अनेकदा प्रवासी खासगी प्रवासी वाहतुकीकडे गेल्याने केवळ प्रवासी प्रतिसादाअभावी एसटी महामंडळाला गेल्या वर्षभरात पाच महत्त्वाच्या मार्गांवरील ८ गाड्या बंद कराव्या लागल्या आहेत.

एसटी महामंडळाच्या काही गाड्या रात्रराणी, असे नाव देऊन रात्री भाडे जास्त घेतले जाते. या मार्गावर दिवसा शंभर रुपये भाडे असेल, तर रात्री ते १२० रुपये असते. मात्र, रात्रीच्या गाडीत कोणत्याही जादा सुविधा नसताना २० ते ३० रुपये जादा भाडे जास्त घेतले जाते. दूर अंतराचा प्रवास बहुतांशीजण रात्रीच करतात. राज्यभरात एकूण प्रवासी वाहतुकीतील ३० टक्‍क्‍यांहून अधिक प्रवासी रात्री प्रवास करतात. त्यांपैकी, २० टक्के प्रवासी रातराणीचा प्रवास करतात. त्यातून दिवसाला पंचवीस लाख रुपयांचा महसूल एसटीकडे जादा वसूल केला जातो. महिन्याकाठी पाऊन कोटीचा महसूल वाढ एसटीला मिळतो. त्याच मार्गावर दिवसा प्रवास रात्रीचा प्रवास कोणताच फरक नसताना जास्त पैसे का द्यावेत, याचे समाधानकारक उत्तर प्रवाशांना मिळत नाही.  खासगी गाड्यांना कोल्हापूर-पुणे प्रवासासाठी दोनशे, अडीशे, तीनशे रुपये असे भाडे असते, तर एसटीला साडेतीनशे रुपयांच्या पुढे भाडे आहे. पन्नास-शंभर रुपये जास्त देऊन प्रवास करावा लागतो. त्याला काही विशिष्ठ प्रवासी वर्गाचा प्रतिसाद जरूर लाभतो,  यात कोल्हापूर -हिंजवडी-कोल्हापूरला आयआयटीयन्सचा सर्वाधिक प्रतिसाद एसटीगाडीला आहे; पण सर्व समान्य वर्ग पन्नास-शंभर रुपयांचे भाडे कमी जाते म्हणून खासगी गाडीने प्रवास करतो, हेही वास्तव आहे. अशी भाड्यातील तफावत दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांना असल्याने एसटीच्या गाडीचा प्रवासी वर्ग कमी झाला. परिणामी गाड्या बंद कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे खासगी गाड्यांच्या स्पर्धेची तुलना करताना स्थानिक पातळीवर एसटीचे भाडे कमी करण्याची आवश्‍यकता आहे. त्याकडे सर्वच पातळ्यांवर दुर्लक्ष झाल्याचे दिसते.   

एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना तिकीट दर कमी-जास्त करण्याचे अधिकार नाहीत, असे अधिकार शासनाच्या स्टेट टान्स्पोर्ट ॲथोरिटीला आहेत. एसटी मुख्यालयाचे मुंबईतील उच्चस्तरीय अधिकारी भाडेपत्रक प्रथम मंजुरीस पाठवतात. त्याला शासनाची मंजुरी मिळाली, की अंमलबजावणी सुरू होते. मात्र, त्यासाठी किमान एक ते दीड-दोन महिन्यांचा कालावधी जातो. मात्र, याच कालावधीत एसटी महामंडळाचा वाहतुकीचा विभागात भाडे कमी किंवा अधिक करणे ही बाब शासनाला कशी पटवून देतात. यावर बहुतांशी मंजुरी अवलंबून असते, तर काही वेळा स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट ॲथोरिटीचे प्रतिनिधी एसटीचा अहवाल किती गांभीर्याने घेतात हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे भाडेवाढ गतीने होते. भाडे कमी करण्याचा प्रकार अपवादाने घडतो. तेव्हा एसटीचा प्रवासी वर्ग खासगी व असुरक्षित वाहतुकीकडे वळतो. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन भाडे कमी-अधिक करण्याचा निर्णय गतीने होणे अपेक्षित आहे. अन्यथा एसटी व प्रवाशांच्या नुकसानीत भर पडणार असल्याचे चित्र आहे.

वर्षभरात बंद झालेल्या गाड्या अशा
कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-मुंबई शिवनेरी, प्रत्येकी दोन कोल्हापूर-ठाणे, कोल्हापूर-लातूर, कोल्हापूर-नाशिक प्रत्येकी एक, चंदगड-कुर्ला-भाईंदर (प्रत्येक एक) याशिवाय कोल्हापूर-बंगळूर, कोल्हापूर-हैदराबाद प्रत्येकी एक गाडी दीड वर्षापूर्वीच बंद झाली.

Web Title: passenger transport from away by Extra night rent