माहेरची भेट म्हणून फक्त वीस मिनिटे द्या - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पाथर्डी - मी कोणासमोर कधीही झुकले नाही; पण समाजासाठी नतमस्तक होते. समाज बांधणे जमलं नाही तर तो तोडणे तरी आपण होऊ देऊ नये. मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा. दिवाळीची माहेरची भेट म्हणून फक्त वीस मिनिटे वेळ वर्षातून एकदाच द्या. लेक म्हणून पहिली आणि शेवटची विनंती करते, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांना पत्राद्वारे म्हटले आहे.

नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्यासह तीन जणांनी आज हे पत्र भगवानगडावर जाऊन नामदेवशास्त्री यांच्याकडे सुपूर्त केले. मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे, की भगवानगडाच्या लाखो भक्तांची तळमळ पाहून मी कोणाचीही मध्यस्थी न घेता मीच विनंती करते. दसऱ्याच्या दिवशी गडावर फक्त वीस मिनिटे द्या. मी परत येणार नाही. भक्तांना त्रास होऊ नये, माझ्या कोणत्याही भावाला इजा होऊ नये, त्यांच्या भावना जपण्यासाठी कृपया सकारात्मक निर्णय घ्याल ही अपेक्षा.'

पत्र वाचून नामदेवशास्त्री म्हणाले, 'मी गडावर पंकजा मुंडे यांचे स्वागत करतो. त्यांनी गडाची कन्या म्हणून माहेरचे जेवण करावे. मात्र गडावर भाषण करता येणार नाही. तसा निर्णय मी घेतला आहे.''

"मुंडे यांच्या पत्राचे उत्तर मी तुमच्याकडे द्यावे का,' अशी विचारणाही महंतांनी डॉ. गर्जे यांना केली. मात्र, "तुम्ही ते ताईंनाच द्या,' असे त्यांनी महंतांना सांगितले.

"सकाळ'ने संपर्क साधला असता महंत म्हणाले, ""मला पंकजा मुंडे यांचे पत्र मिळाले. धार्मिक जागेचा राजकीय कारणासाठी वापर केल्याचा गुन्हा माझ्यावर यापूर्वीच दाखल झाला आहे. त्यामुळे गडावर राजकीय भाषण होणार नाही, हा निर्णय गडाच्या विश्‍वस्तांनी घेतलेला आहे. तो बदलता येणार नाही.''

Web Title: pathardi news pankaja munde