कोरोनाचा आता कोपरगावकडे मोर्चा, वृद्धेला झाली लागण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

कोपरगाव येथील बाधित महिलेला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे तिला तपासणीसाठी कोपरगाव येथून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. तिच्या घशातील स्त्राव नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविले. 

नगर - कोरोनाने केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. पहिल्यांदा नेवासा, जामखेड मग संगमनेर, श्रीरामपूर आणि आता कोपरगावकडे तो येतो आहे. सर्वाधिक पेशंट नगर शहरातील आहेत. त्याखालोखाल जामखेड आणि संगमनेर तालुक्यात. केवळ तबलिगींमुळे ही संख्या वाढली हे जरी खरे असले तरी इतरांच्याही संपर्कातून ही साथ परसते आहे. आज कोपरगावातील एका महिलेला याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले

आतापर्यंत जिल्ह्यात २७जणांना लागण झाली. त्यातील तीनजणांना डिस्चार्ज मिळाला तर एका गतिमंद कोरोनाग्रस्ताचा पुण्यात मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा पहिला बळी आहे. त्याला इतरही आजाराने ग्रासले होते.

कोपरगावचा परिसर सील

 जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या  स्त्राव चाचणीमध्ये कोपरगाव येथील एक ६० वर्षीय महिला कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोपरगाव येथील ती महिला राहत असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा - मरकज ते माणिकदौंडी कनेक्शन

नागरिकांनी स्वताची काळजी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये. संपर्क टाळावा आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हावासियांना केले आहे. 

ना प्रवास केला ना कोणाच्या संपर्कात तरीही

कोपरगाव येथील बाधित महिलेला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे तिला तपासणीसाठी कोपरगाव येथून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. तिच्या घशातील स्त्राव नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविले. आज अहवाल प्राप्त झाला त्यात ही महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. मात्र, ही महिला अद्याप कोणत्याही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झालेले नाही तसेच या महिलेने, तिने कुठेही प्रवास केला नसल्याची माहिती दिली आहे. ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती, याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून घेतली जात आहे.

१०१४जणांचे घेतले स्वॅब

दरम्यान, आज अखेरपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने १०१४ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील २५ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत.  या २५ बाधिताशिवाय एक जण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील आहे. दुसरा बाधित रुग्ण हा मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील असून तो पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याचा आज सकाळी मृत्यू झाला.

एकूण ९२० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अद्याप ६२ स्त्राव नमुना चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे. ०७ स्त्राव अहवाल प्रयोगशाळेने नाकारले आहेत.  जिल्हा रुग्णालयात १५९ जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण ५९३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.        


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patient of female coronary disease in Kopargaon