शिरोळमध्ये मदतकार्यादरम्यान पिंपरीचे महापौर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

 शिरोळ तालुक्‍यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेले पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव आणि शिरोळ पोलिसांमध्ये मंगळवारी बाचाबाची झाली.

जयसिंगपूर - शिरोळ तालुक्‍यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेले पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव आणि शिरोळ पोलिसांमध्ये मंगळवारी बाचाबाची झाली. मदतकार्यात पोलिसांकडून जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप महापौर जाधव यांनी केला असून, चार सेवाभावी संस्थांच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून 55 जणांची टीम पूरग्रस्तांच्या मदतकार्यात आहे.

महापौर जाधव आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन संघ पुणे, मुळशी आपत्ती व्यवस्थापक समिती, लवासा लेक शोअर वॉटर स्पोर्ट, ऍम्बी व्हॅली सिटी सहारा इंडिया, महेशदादा स्पोर्ट फाऊंडेशन यांच्यावतीने शिरोळ तालुक्‍यातील विविध गावांमध्ये मदतकार्य सुरू आहे. स्वत:च्या सहा बोटी आणि 55 जणांकडून पूरग्रस्त गावात जाऊन जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्याबरोबर पूर ओसरल्यानंतर दिल्या जाणाऱ्या मदतीसाठीचा सर्व्हे केला जात आहे. 

महापौर जाधव आणि सहकारी हसूरच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी महापौर आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. आम्ही 55 जण गेल्या पाच दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी मदतकार्यात आहोत. स्वत: खर्च करून ही मोहीम हाती घेतली आहे. असे असताना तुम्ही कशासाठी रोखता? असा सवाल जाधव यांनी केला.तासभर विनवणी करूनही पोलिसांनी त्यांना सोडण्यास नकार दिला.
 
चिंचवाडचे सामाजिक कार्यकर्ते अजित चौगुले, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक विजय लांडे, प्रमोद बलकवडे (मुळशी), शाम पटेल (सहारा), सॅडविन मेंझोस (लवासा) यांच्यासह काहींनी मध्यस्थी केल्यानंतर केवळ महापौरांना सोडू, असा पवित्रा पोलिसांनी घेतला. मात्र, त्यांच्याबरोबर मदतकार्यात असणाऱ्या नगरसेवकांना सोडण्यास नकार दिल्यानंतर काही काळ गोंधळ उडाला. पोलिसांकडून मदतकार्यात अडथळा आणला जात असल्याचा आरोप महापौरांनी केला. अखेर पोलिसांच्या अपमानास्पद वागणुकीनंतर पथक मंगळवारी दुपारी निघून गेले. 

पोलिसांनी जाणीवपूर्वक आम्हाला मदत कार्यापासून रोखले. कोण महापौर? आम्ही ओळखत नाही? असे उर्मट वक्तव्यही केले. शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड आणि परब व पवार या तिघांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे. मात्र, पूरग्रस्तांच्या कार्यात याचा अडथळा आणू देणार नाही. पूर ओसरल्यानंतर पुन्हा आम्ही मदतकार्यात आघाडी घेऊ, महापौर जाधव यांनी सांगितले.

महापौर राहुल जाधव व अथवा त्यांच्या लोकांना मदतकार्यापासून परावृत्त केले नाही. तर आज पूरग्रस्तांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे. जनावरांना चारा नेण्याबरोबर जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करावा यावर प्रशासन आग्रही आहे. केवळ गैरसमजातून हा प्रकार घडला आहे, असे जयसिंगपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCMC mayor and police altercation