गुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा

पांडुरंग बर्गे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर जिल्हा बॅंकेत जमा झाले. प्रत्यक्षात सर्व शिक्षकांना हे वेतन हातात मिळण्यासाठी उद्याचा (ता. १८) किंवा सोमवारचा (ता. २०) दिवस उजाडणार आहे.

कोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर जिल्हा बॅंकेत जमा झाले. प्रत्यक्षात सर्व शिक्षकांना हे वेतन हातात मिळण्यासाठी उद्याचा (ता. १८) किंवा सोमवारचा (ता. २०) दिवस उजाडणार आहे.

जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा उलटून गेला तरी न झाल्यामुळे त्यांच्यावर दैनंदिन खर्चासाठी उसनवारी करण्याची वेळ आली आहे. त्याला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील पेन्शन विभाग जबाबदार असल्याचे निवृत्ती वेतनधारकांचे म्हणणे होते. सेवानिवृत्तांची ही समस्या ‘सकाळ’ने रविवारी (ता. १२) प्रसिद्ध केली. जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व सेवानिवृत्त संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या पेन्शन विभागाने तातडीने हालचाल करत अखेर मंगळवारी जिल्हा बॅंकांच्या तालुकास्तरावरील शाखांत वेतन जमा केले.

त्यामुळे तालुकास्तरावरील शिक्षकांना गुरुवारी (ता. १६) वेतन मिळू शकले. मात्र, जिल्हा बॅंकेच्या तालुक्‍यातील इतर शाखांसह इतर बॅंकांच्या शाखांमध्ये सेवानिवृत्तीधारकांच्या याद्या या स्वतः किंवा कुरिअरने जात असल्याने त्या जेथे गुरुवारी पोचल्या तेथे त्यादिवशी वेतन मिळाले असेल, तर काही ठिकाणी या याद्या पोचण्यासाठी उद्याचा दिवस उजाडणार असल्याने तेथे उद्या किंवा सोमवारी वेतन मिळेल, असा अंदाज आहे.

सेवानिवृत्तांकडून ‘सकाळ’ला धन्यवाद
सेवानिवृत्ती वेतनासाठी आंदोलनाचा इशारा दिलेल्या सातारा जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बा. दि. बर्गे, कार्याध्यक्ष सुधाकर जोर्वेकर, उपाध्यक्ष सुदाम खरात यांनी याप्रश्‍नी आवाज उठवल्याने ‘सकाळ’ला धन्यवाद दिले. यापुढे तरी जिल्हा परिषदेचा पेन्शन विभागासह ट्रेझरीने समन्वय राखून वेळच्या वेळी पेन्शन अदा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: pension deposit on headmaster account