लोकांनी नाकारल्याने सत्तेत रस नाही - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

सांगली - झेडपीच्या निवडणुकीत लोकांनी आम्हाला नाकारल्याने सत्तेसाठी रस दाखवणार नाही, असे विधान करून राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आमचे सदस्य विरोधात बसतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते, असेही आमदार पाटील आठवण करून देण्यास विसरले नाहीत.

सांगली - झेडपीच्या निवडणुकीत लोकांनी आम्हाला नाकारल्याने सत्तेसाठी रस दाखवणार नाही, असे विधान करून राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आमचे सदस्य विरोधात बसतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते, असेही आमदार पाटील आठवण करून देण्यास विसरले नाहीत.

प्रसार माध्यमांशी बोलतांना आमदार पाटील यांनी मन मोकळे केले. ते म्हणाले, 'जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आघाडीची गरज होती. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांकडे याबाबत निरोप दिले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. भाजप-सेनेपेक्षा कॉंग्रेसला एक नंबरचा शत्रू राष्ट्रवादी असल्याचे वाटले. भविष्यात जातीयवादी भाजपला रोखायचे असेल तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मनापासून आघाडीची गरज आहे. यापुढे एकमेकांच्या जिरवाजिरवीचे राजकारण बंद करून भाजप हद्दपारासाठी प्रयत्न हवा. त्यासाठी आघाडीची मजबूत बांधणी होणे आवश्‍यक आहे.''

ते म्हणाले, 'आमच्या पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये गेले. राष्ट्रवादी एकाकी पडला असतानाही कॉंग्रेसपेक्षा चांगल्या जागा मिळाल्या.

कॉंग्रेसची जिल्ह्यात एवढी वाईट अवस्था होईल, असे वाटले नव्हते. त्यापेक्षा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगले लढले. प्रयत्नांची पराकाष्टा केली, आमचे अनेक उमेदवार कमी मताधिक्‍यांनी पराभूत झाले. कवठेमहांकाळ-तासगावमध्ये पक्षाला कौतुकास्पद यश मिळाले. राष्ट्रवादीने आता शांत बसायचे ठरविले आहे. जनतेने नाकारले असून सत्तेसाठी पुढे-पुढे करणार नाही. विरोधात बसून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू.''

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांचा माझ्यावर राग होता. त्यांनी ऐकले नाही. परंतु आघाडीबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. योग्यवेळी योग्य बुद्धी सुचणे शक्‍य असते, पण तसे झाले नाही. चांगली बुद्धी सुचली असती तर झेडपी, सर्व पंचायत समित्यांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्याचे चित्र पाहायला मिळाले असते.
- आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते

Web Title: People not interested in power, was refused