लोकसहभागाची धगधगतीय मशाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

ढेबेवाडी (सातारा) - मान्याचीवाडी (ता. पाटण) स्वच्छतेमुळे राज्यात परिचित आहे. 18 वर्षांपूर्वी लोकसहभागातून पेटविलेली स्वच्छतेची मशाल आजही धगधगते आहे. मालदन ग्रामपंचायतीतून 2001 मध्ये मान्याचीवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. पहिले सरपंच (कै.) तात्यासाहेब माने माध्यमिक शिक्षक होते. त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा प्रारंभ स्वच्छता अभियानाने केला. ग्रामस्थांनीही भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक मंगळवारी ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावसफाईला सुरवात केली. त्या वेळी गावात उघडी गटारे होती. अस्ताव्यस्त कचरा, दलदल असायची. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे काही दिवसात गाव चकाचक झाले. श्रमदानाने पायवाटांना रस्त्याचे रूप दिले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील आघाडी आजतागायत कायम आहे. तालुक्‍यापासून राज्यापर्यंतची पारितोषिके गावाने पटकावलीत. सांडपाणी व्यवस्थापन, घरोघर शौचालय, सार्वजनिक कचराकुंड्या, बंदिस्त गटारे, कचरा व्यवस्थापन, गांडूळखत प्रकल्प गावात आहेत. शेणखतासाठीचे उकिरडे बुजवून गावाबाहेर नॅपेडचे बांधकाम झाले.

महिलांचे दहा बचत गट आहेत. 15 दिवसांनी महिला बैठकीसाठी एकत्र येऊन साफसफाई करतात. तुळस लागवडीतून ऑक्‍सिजन पार्क, शुद्ध पाण्याचे एटीएम इत्यादींमुळे मान्याचीवाडीत आरोग्यही नांदतंय.

मध्यंतरी गावात दवाखाना सुरू झाला; पण रुग्णांअभावी तो बंद झालाय. सरपंच रवींद्र माने, उपसरपंच अधिकराव माने स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष देतात.

घर आणि परिसराची स्वच्छता प्रत्येकाच्या अंगवळणी पडल्याने ग्रामपंचायतीला फारशी धावाधाव करावी लागत नाही. गावात संस्कार म्हणून स्वच्छता जपली जाते.
- रवींद्र माने (सरपंच, मान्याचीवाडी)

Web Title: People participation development manyachiwadi cleaning