प्रदीर्घ काळाने सांगलीत संकष्‍टीला ‘मोरया’चा गजर

अजित कुलकर्णी
Friday, 4 December 2020

गणेशोत्सव, संकष्टीसह महत्त्वाच्या सणादिवशी भाविक प्रवेशद्वारातूनच दर्शन घेत

सांगली : कोरोनामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या येथील गणपती पंचायतन संस्थानच्या मंदिरात दर्शनासाठी आज संकष्टीचे औचित्य साधून गर्दी झाली. यावर्षातील शेवटची संकष्टी असल्याने भाविकांचा उत्साह होता. मंदिरे खुली करण्याच्या निर्णयानंतर तब्बल नऊ महिन्यांनी मंदिरात ‘गणपती बाप्पा मोरया’ चा गजर केला. कोरोना सुरक्षिततेचे नियम पाळून प्रवेश दिला जात होता. भाविकांनीही शिस्तबद्धरीत्या दर्शन घेतले. पहाटेपासून मांदियाळी होती.   

हेही वाचा- बारा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर अरुण लाड झाले आमदार: कुंडलगावात दिवाळी -

गणेशोत्सव, संकष्टीसह महत्त्वाच्या सणादिवशी भाविक प्रवेशद्वारातूनच दर्शन घेत. सांगलीसह कोल्हापूर, कर्नाटकातून आलेल्या भाविकांनी कोरोना संसर्गाच्या भीतीने नऊ महिने व्यवस्थापनाने शासन आदेशाचे पालन करत मंदिर बंद ठेवले होते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर टाळे खुले झाले. आज संकष्टीला दूरदूरचे भाविक आले होते. प्रवेशद्वारातून आत जातानाच मास्क अनिवार्य करण्यात आला होता. मेटल डिटेक्‍टरच्या तपासणीतून जाताच सॅनिटायझर फवारले जाई. प्रदीर्घ कालावधीनंतर दर्शन घेताना भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.  सायंकाळी बॉम्ब शोधक पथकासह श्‍वान पथकाने विविध ठिकाणी तपासणी केली. मंदिर परिसर, रस्ते  गर्दीने फुलले होते.

 संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people visited sangli ganpati temple