भूस्खलन बाधितांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार ; श्वेता सिंघल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवल्याने जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही धोकादायक स्थितीत राहावे लागली नाही.

सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित झालेल्या सातारा तालुक्‍यातील टोळेवाडी, मोरेवाडी, पाटण तालुक्‍यातील जिमनवाडी, म्हारवण, म्हसुगडेवाडीचा या गावांचा कायमचे पुर्नवसन करण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आले आहेत. पूरग्रस्त गावांमध्ये बाधित झालेले रस्ते, शाळा, शासकीय इमारतींच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीतून 12 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवल्याने जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही धोकादायक स्थितीत राहावे लागली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
सिंघल म्हणाल्या, ""ता. 27 ते आठ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात 707 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध गावांत घरांची पडझड, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. पूरपरिस्थितीमुळे ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे, अशा कुटुंबांना तत्काळ रोखीने पाच हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली आहे. जिल्ह्यातील विविध संस्था, व्यक्तींनी पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे. त्यांच्याकडून मिळालेली मदत सातारा जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांनाही देण्यात आली. जिल्ह्यातील विविध संस्था, व्यक्तींच्या माध्यमातून 47 लाख 71 हजार 304 रुपये पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा झाले आहेत, तसेच दोन हजार 338 कुटुंबांना तांदूळ, गहू, रॉकेलवाटप केले आहे.'' 
सातारा, जावळी, पाटण, महाबळेश्‍वर तालुक्‍यांतील गावांत भूस्खलनाचे प्रकार घडले आहेत. परिणामी सातारा तालुक्‍यातील 158, पाटण तालुक्‍यातील 108, जावळी तालुक्‍यातील 179 कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर केले. भूर्गभ शास्त्रज्ञ संबंधित गावांचा अभ्यास करून प्रशासनास अहवाल देतील; परंतु काही गावांमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची आवश्‍यकता असल्याने शासनास संबंधित गावांच्या कायमच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठविलेला आहे. यात सातारा तालुक्‍यातील टोळेवाडी, मोरेवाडी, पाटण तालुक्‍यातील जिमनवाडी, म्हारवण, म्हसुगडेवाडीचा समावेश आहे. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे उपस्थित होते. 

स्थलांतरित मतदान केंद्रांची यादी लवकरच 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्ष प्रतिनिधींसाठी व्हीव्हीपॅट मशिन तपासणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. पूरग्रस्त भागातील 32 मतदान केंद्रांचे स्थलांतर, तसेच 94 मतदान केंद्रांची दुरुस्ती करावी लागणार आहे. स्थलांतरांमध्ये वाईमधील 11, सातारा व फलटणमधील सहा, कोरेगावमधील पाच, कऱ्हाड उत्तरमधील तीन, तसेच पाटणमधील एका मतदान केंद्राचा समावेश आहे. स्थलांतरित केलेल्या मतदान केंद्रांची यादी लवकरच घोषित करू, असे सिंघल यांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permanent rehabilitation of landslide impairments says Shweta Singhal