उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी 'तो' पत्नीसह चालला 100 किमी

भारत नागणे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

- शिवसैनिक असलेली व्यक्ती पायी अनवानी गेली

पंढरपूर : बा...विठ्ठला आम्हा...शिवसैनिकांचे दैवत आणि शेतकऱ्यांचा तारणहार उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळू दे, असे साकडे जत (जि.सांगली) तालुक्यातील एका शिवसैनिकाने पत्नीसह अनवानी चालत येऊन आज विठ्ठल रुक्मिणीला घातले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

बनाळी (ता.जत.जि.सांगली) येथील संजय आणि रुपाली सावंत या पती-पत्नी शिवसैनिकांनी सुमारे 100 किलोमीटर अंतर अनवानी चालत येऊन विठुचरणी हे  मागणं घातलं. दरम्यान उद्या (ता.15) उद्धव ठाकरे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते आल्यानंतर त्यांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून तुळशीची माळ आणि चंद्रभागेचे तीर्थ भेट देण्यात येणार आहे. विठ्ठलाचा हा प्रसाद विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी सावंत यांच्याकडे सुपूर्त केला.

फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

गेल्या अठरा दिवसांपासून राज्यात सत्तेचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपने सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे नवीन राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता आहे. हे नवीन राजकीय समीकरण जुळून आले तर मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच व्हावेत यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय सावंत व त्यांच्या पत्नी रुपाली यांनी सलग तीन दिवस अनवानी पायी चालत सुमारे 100 किलोमीटर प्रवास करुन विठ्ठलाला आज साकडे घातले.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांची तीव्र इच्छा आहे. अनेक शिवसैनिकांनी यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत तर अनेकांनी पण देखील केला आहे. तर काहींनी देवाला साकडे घातले आहे. कष्टकरी शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या विठ्ठलाला देखील अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी साकडे घातले आहे.

सांगलीच्या संजय सावंत यांनी  मात्र चक्क पायी अनवानी चालत निरंकार उपवास करत उद्धव ठाकरेंसाठी पायी पंढरीची वारी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Person walked with wife for Uddhav Thackeray become CM