व्हिडिओ : पंचगंगा नदीच्या मूळ संगमावरील स्नान पर्वकाळ यात्रेला सुरूवात... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

प्रयागवर मकर संक्रातीला पुण्यकाळात संगमात स्नान करण्याचे भाविक पवित्र मानतात. दत्तमंदिरात पहाटे अभिषेक, काकड आरती होऊन सकाळी सात वाजता दत्तात्रेयांची पालखी दत्त स्नानासाठी गंगेवर गेली.

कोल्हापूर - प्रयाग चिखली (ता.करवीर) येथील श्री. क्षेत्र "प्रयाग" येथील पंचगंगा नदीच्या मूळ संगमावरील स्नान पर्वकाळ यात्रेला आज धार्मिक वातावरणात सुरुवात झाली. संगमावरील पवित्र स्नान आणि दत्त दर्शनासाठी शेकडो भाविकांनी क्षेत्र प्रयाग येथे पहाटेपासून गर्दी केली होती. आज सूर्योदयापासून सुरू झालेला स्नान पर्वकाळ पुढे 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. 

महिनाभर चालणार स्नान सोहळा

यंदाही महापुण्य पुण्यपर्व काळाच्या योगावर श्री दत्तात्रेयांच्या मुर्तीस संगमात स्नान सोहळा झाल्यानंतर दिवसभरात क्षेत्र प्रयाग येथे कोल्हापूर, सांगली, सातारा आदी भागातून आलेल्या हजारो भाविकांनी स्नान व दर्शनाचा लाभ घेतला. 
सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना येथील संगमावरील स्नानाचा पुण्यपर्वकाळ मानला गेला. या क्षेत्रावर कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि धामणी या पाच नद्यांचा संगम आणि संगमातून पंचगंगेचा उगम होतो. येथून पंचगंगा पुढे शिरोळ तालुक्‍यात कृष्णा नदीला मिळते. 

वाचा - या पोस्टकार्डने जोडली १५१ देशांमधली माणसं !

शेकडो भाविकांची गर्दी

प्रयागवर मकर संक्रातीला पुण्यकाळात संगमात स्नान करण्याचे भाविक पवित्र मानतात. दत्तमंदिरात पहाटे अभिषेक, काकड आरती होऊन सकाळी सात वाजता दत्तात्रेयांची पालखी दत्त स्नानासाठी गंगेवर गेली. यावेळी संगमावर दत्तमूर्ती स्नान घालण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली. स्नान सोहळ्यानंतर पालखी मिरवणूक काढली, आरती होऊन भाविकांना मंदीर दर्शन खुले झाले. मंदिरातील पूजा, विधी येथील पुजारी समाधान गिरी यांनी केली. दिवसभरात विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी स्नान व दर्शनासाठी गर्दी केली. येथे विविध खेळण्याचे, प्रसादाचे तसेच फास्ट-फुडचे स्टॉल उभारले आहेत. यात्रा काळात येथे दररोज आरती भजन, प्रवचन, अध्यात्मिक ग्रंथवाचन, महाप्रसाद असे विविध धार्मिक-अध्यात्मिक कार्यक्रम होतील. 

वाचा - बहिणीच्या नवऱ्याला किडनी देत जपलं तिच कुंकू....

विविध सुविधा देण्याची मागणी 

महिनाभरात महाराष्ट्रातून येणारे भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने बस सेवा, रस्ता, विज, पिण्याचे शुद्ध पाणी, सुलभ शौचालय, बैठक व्यवस्था, विश्रांती स्थाने, पार्किंग व्यवस्था, यांत्रिक बोट व सुसज्जआपत्ती व्यवस्थापक टीम, पोलीस बंदोबस्त, आशा सेवा सुविधा पुरवाव्यात अशी मागणी भाविकांतून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pilgrimage to the bath on the confluence of the Panchganga river at Prayag began today in a religious atmosphere