आषाढीसाठी यंदा चार हजार एसटी बसेसचे नियोजन 

तात्या लांडगे
सोमवार, 25 जून 2018

सोलापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे येत्या 23 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन विभागाने तीन हजार 781 एसटी बसेसचे नियोजन केले आहे. 

सोलापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे येत्या 23 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन विभागाने तीन हजार 781 एसटी बसेसचे नियोजन केले आहे. 

आषाढी एकादशीसाठी मराठवाडा, खानदेशासह पश्‍चिम महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरला येतात. त्यामुळे यावर्षी राज्य परिवहन मंडळाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी 21 ते 28 जूलै या दरम्यान विशेष एसटी गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यासाठी सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. पंढरपूरसह सोलापूर आगारातून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी बसस्थानकांवर पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, फिरती स्वच्छतागृहे, उपहारगृह, रुग्णवाहिका, चौकशी कक्ष, संगणकीय उद्‌घोषणा कक्ष अशा सुविधा करण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस पंढरपूरच्या पांडूरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी वाढतच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा सोलापूर विभागातून सुमारे 250 एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. 

दरवर्षी आषाढी वारीसाठी वारकऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नापेक्षा वारकरी सेवा महत्त्वाची मानून प्रवाशांना जास्तीत-जास्त चांगल्या सुविधा देण्यात येतील. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. 
- रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, सोलापूर 

ठळक बाबी... 
- विठ्ठल सहकारी कारखाना बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी विशेष गाड्या 
- प्रवाशांसाठी बसस्थानकांवर सर्व अत्यावश्‍यक सोयी-सुविधा 
- वृध्द, अबाल व स्त्रीयांसाठी दहा टक्‍के आगाऊ आरक्षणाची सोय 
- वारकऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन जागेवरच मिळणार आरक्षण 
- गर्दीवरील नियंत्रणासाठी बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे 
- सोलापूर विभागातून 250 गाड्यांची सोय

Web Title: planning of 4 thousand st buses for waari Pilgrims