पाणीगळतीवर अण्णांनी दिला प्लॅस्टिकचा पर्याय 

plastic is best solution for water waste
plastic is best solution for water waste

पारनेर : राज्य सरकारने गेल्या 45 वर्षांत पाण्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र, अद्यापि राज्यातील टॅंकर बंद झाले नाहीत. दर वर्षी टॅंकरवर कोट्यवधी रुपयांचा खर्च सरकार करते. त्या ऐवजी गळती असलेले नालाबांध, बंधारे व तलावातील गळती थांबविण्यासाठी बांधाच्या आतील बाजूने पाया खोदून प्लॅस्टिक कागद टाकला, तर गळती थांबून दरवर्षी टॅंकरवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च थांबेल, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी "सकाळ'शी बोलताना काढले. 

गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकार जलसंधारणाच्या नावावर विविध योजना राबविते. त्यात सध्याची जलयुक्त शिवार असेल किंवा पूर्वीचा अवर्षणप्रवण कार्यक्रम असेल, अशा विविध नावावर सरकारने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. मात्र, अद्यापि राज्यातील टॅंकरवरचा खर्च कमी झाला नाही. याबाबत सरकारने संशोधन करणे गरजेचे आहे, असा सल्ला हजारे यांनी सरकारला दिला. 

हजारे म्हणाले, ""सरकारकडून जी जलसंधारणाची कामे राबविली जातात, त्यातील त्रुटी सरकारने शोधणे गरजेचे आहे. मात्र, सरकारने तसे केले नाही. जलसंधारणाच्या कामात अनेक तांत्रिक दोष आहेत. 1972 च्या दुष्काळात सरकारने अनेक जलसंधारणाची कामे केली. त्या वेळी लोकांना रोजगार मिळवून देणे, हाच सरकारचा हेतू होता. मात्र, त्यानंतरच्या काळात असे दिसले नाही.'' 

सध्या सरकारने सिमेंटचे बंधारे बांधण्यावर जोर दिला आहे. वास्तविक एका सिमेंट बंधाऱ्याच्या खर्चात चार गॅबियन बंधारे तयार होतात. सध्या नालाबांध, बंधारे व तलावासाठी फारशा जागा शिल्लक राहिल्या नाहीत. त्या साठी आहेत त्या बंधाऱ्यांची गळती थांबवणे, त्यातील गाळ काढणे ही काळाची गरज आहे. बंधाऱ्याच्या आतील बाजूस चर खोदून त्यात माती भरून त्यावर प्लॅस्टिकचा कागद टाकून त्यावर दगडी ताल घातली, तर त्या बंधाऱ्याची गळती शंभर टक्के थांबेल. 

बंधाऱ्यांची गळती शंभर टक्के थांबवली

""आम्ही गेल्या उन्हाळ्यात आठ बंधाऱ्यांसाठी वरील प्रयोग राबविला आहे. या बंधाऱ्यांची गळती शंभर टक्के थांबवली आहे. त्यासाठी प्रत्येकी फक्त अडीच लाख रुपये खर्च आला. त्यामुळे ते बंधारे आता अनेक दिवस तुडुंब भरलेले राहतील. परिसरातील विहिरीही भरलेल्या राहतील. बंधाऱ्यांना आतील बाजूने प्लॅस्टिकचा कागद टाकून गळती थांबविली असल्याचा अभिनव प्रयोग आम्ही राज्यात प्रथमच राबविला आहे. या उपक्रमाची माहिती जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांना दिली आहे. हा उपक्रम राज्यभरात राबवावा, अशी आमच्यात चर्चा झाली असल्याने पुढील आठवड्यात डवले राळेगणसिद्धी येथे हा उपक्रम पाहण्यासाठी येत आहेत,'' असेही अण्णांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com