
सांगली : भाळवणीच्या पूजाशी पंतप्रधान साधणार संवाद
आळसंद : भाळवणी खानापूर येथील पूजा आनंदा जाधव या विद्यार्थिनीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता. ६) संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातून दोन मुलींची निवड झाली आहे. त्यापैकी भाळवणीची पूजा जाधव एक असून दुसरी नागपूरची आहे.
कोरोना महामारीची अनेकांना झळ बसली. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेकांचे आई-वडील कोरोनाच्या साथीत मृत्यूमुखी पडले. त्याची झळ पूजाच्या कुटुंबीयांना बसली. पूजाच्या आई-वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाला. आई हिराबाई यांचा २२ मे तर वडील आनंदा यांचा २९ मे २०२१ रोजी उपचार दरम्यान मृत्यू झाला.
कोरोना लाटेत आई-वडिलांचा मृत्यू झाला. अशा कुटुंबीयांचा केंद्र-राज्याने आर्थिक मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला. जिल्हा महिला व बाल विकास (सांगली) अभय केंद्र पंचायत समिती (विटा) येथील संरक्षण अधिकारी सागर रावताळे यांनी सामाजिक तपासणी दरम्यान भाळवणीच्या पूजाचे कुटुंब पीडित आढळले. त्यांचा सविस्तर अहवाल जिल्हा महिला बाल विभागाकडे सादर केला. कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना केंद्राच्या वतीने १० लाख, तर राज्यशासनाच्या वतीने ५ लाख शिक्षणासाठी दिले जाणार आहेत.
पूजा सध्या कराडच्या सद्गुरू गाडगेबाबा महाराज महाविद्यालयात इयत्ता १२ वी शास्त्र शाखेत शिकत आहे. पूजा दहावीत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या पूजाशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार असल्याने परिसरात उत्सुकाता निर्माण झाली आहे.
सामाजिक तपासणीचा सर्वेक्षण करताना पूजा जाधव हिचे आई-वडील कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्याचा सविस्तर अहवाल जिल्हा महिला बाल विकास विभागास सादर केला. त्यात पूजा जाधव मदतीस पात्र ठरली आहे.
-सागर रावताळे, संरक्षण अधिकारी, अभय केंद्र,पंचायत समिती (विटा)
पंतप्रधान मोदी आमच्याशी संवाद साधणार ऐकल्यानंतर एकाबाजूला आनंद तर दुसरीकडे खंत वाटली. आई-वडील नसल्याचे दु:ख होत आहे. उर्वरित आयुष्यात शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे.
- पूजा जाधव,भाळवणी
Web Title: Pm Interact Pooja Sangli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..