कऱ्हाडला गुंडांच्या टोळ्यांचे थेट मटका कनेक्‍शन ; पोलिस कारवाईचा फुगा खुनामुळे फुटला

कऱ्हाडला गुंडांच्या टोळ्यांचे थेट मटका कनेक्‍शन ; पोलिस कारवाईचा फुगा खुनामुळे फुटला

कऱ्हाड  ः कऱ्हाडला आजपर्यंत जेवढ्या गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या, त्या सगळ्यांना "मटका बुकीं'च्या माध्यमातून पैसा पुरविला गेल्याचे वास्तव आहे. मटक्‍याच्या आकड्यातील लाखोंची उलाढाल गुंडांना आकर्षित करते. त्यातून पोसल्या जाणाऱ्या गुंडांच्या टोळ्या पोसण्याची सवय मटका बुकीच लावतात. मग त्यातून सुरू होतो वर्चस्ववाद. ज्या टोळीला बुकी पैसा पुरवतो, त्याच्या विरोधातील टोळी बुकीला वेठीस धरते. हा प्रकार काल झालेल्या पवन सोळवंडे यांच्यावरील हल्ल्यातून पुढे आलेला आहे. सोळवंडेवर हल्ला झाला, त्याचे वास्तव दाहक आहे. त्याकडे पोलिसांनी उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे. अन्यथा कऱ्हाडकरांचे सामाजिक व व्यावसायिक स्वास्थ्य बिघडल्याशिवाय राहणार नाही. 

टोळ्यांमध्ये होणारे वादाचे कनेक्‍शन मटक्‍याच्या व्यवसायाशी जोडले गेलेले आहे. कालचा गोळीबार व त्यात ठार झालेला गुंड त्याचेच वास्तव आहे, ते स्वीकारावेच लागेल. दहशत माजवत वर्चस्ववाद करणाऱ्या गुंडांच्या टोळ्यांचे मुख्य कनेक्‍शन मटकाच आहे. त्या व्यवसायातील उलाढालीशी त्यांचा थेट संबंध आहे. मटका व्यावसायिकांवर कारवाई केली आहे, असे जरी पोलिस सांगत असले तरी त्यांच्या स्वयंघोषित कौतुकाचा फुगा गुंडांच्या कालच्या चकमकीने फुटला आहे. पोलिसांनी मटक्‍याच्या बाजाराला दिलेली मोकळीक, मटका व्यावसायिकांशी अर्थपूर्ण संबंध पोलिसांना भोवले आहेत. मटका बुकींकडून गुंड व त्यांच्या टोळ्या पोसण्यामुळेही दंगलसदृश स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे त्याच वादातून ठिणगी पडली आणि ती पेटल्याचेही दिसते. शहरात किती मटका बुकी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई केली, याची माहिती कधीही पोलिस खात्याने दिलेली नाही. त्यामुळे शहरात मटका बंद आहे, याच नावाखाली मटका मात्र, खुलेआम सुरू आहे. मटका चालवणारा बुकी वारेमाप पैसे कमावतो आहे. परिणामी त्यांच्याकडे येणाऱ्या अतिरिक्त पैशामुळे अवैध गोष्टीला बळ मिळाले आहे. मटक्‍याचा धंदा आहे, म्हणून मटका बुकी अनेक गुंडांना जोपासतात, त्यांना पोसतातही. वारेमाप पैसा खर्च करून गुंडांना बळ देणाऱ्या मटका बुकींवर मात्र कारवाई होत नाही. मटक्‍यातून येणाऱ्या पैशावर जगणाऱ्या गुंडांच्या टोळ्या पुढे सुसाट होत आहेत. पवन सोळवंडे, जुनेद शेख यांच्यासह अनेक टोळ्या सुसाट आहेत. त्यामागे मटक्‍याचाच पैसा आहे. सोळवंडेवर हल्ला करणारी जुनेद शेख, शिवराज इंगवले यांची टोळी असू दे, नाहीतर सोळवंडेची टोळी असू दे, त्या सगळ्यांचे मटक्‍याच्या पैशाशीच थेट संबंध आहेत. काल झालेल्या गोळीबारातही तेच कारण दडले आहे. दोन्ही टोळ्यांना मटका बुकींचा पैसाच हवा होता. तो कोणाला जास्त मिळणार, याचाच वाद वर्चस्वातून विकोपाला गेला. मटका बुकीने सोळवंडेसह त्याच्या टोळीच्या विरोधात खंडणीची तक्रार दिली होती. तेही पैशाचेच कनेक्‍शन आहे. ज्याच्या विरोधात तक्रार दिली, त्यातील निहाल पठाणचे जुनेद शेखशी संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी खंडणी मागितल्याचा राग मनात धरून जुनेदच्या टोळीने सोळवंडेचा गेम केला. मात्र, त्यामागे मैत्री कमी आणि व्यवहारच जास्त आहे. त्यामुळे मटका बुकींच्या संबंधातून झालेला खून, मटक्‍याच्या पैशातून झालेला गोळीबार म्हणूनही त्याकडे पाहावे लागेल. पैसे पुरवणाऱ्या मटका बुकीला याच टोळ्या सन्मान देतात. त्यांच्या नावावर समाजिक काम केल्याचा अविर्भाव आणतात. त्यामुळे कथित मटका बुकी सामाजिक चेहरा घेऊनही फिरताहेत. त्यांना वेळीच ठेचण्याऐवजी पोलिस त्यांच्याशी आर्थिक लागेबांधे वाढवतात. पोलिसांची हीच कृती मटक्‍याला पोषक व टोळ्यांना बळ देणारी आहे. 


शहरात मटका बंद आहे, त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे, असे पोलिस सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात मटका बुकी पोलिसांच्याच हातात हात घालून फिरताना दिसतात. समाज त्या घटना बघतो, त्यावर समाजातूनही संतापजनक प्रतिक्रिया उमटतात. मात्र, त्याचे काहीही देणे-घेणे पोलिसांना नाही. एक संपला की दुसरा दादा तयार होतो आहे. त्या वाढणाऱ्या गुंडगिरीला मटक्‍यासारख्या व्यवसायातून मिळणारा अमाप पैसाच कारणीभूत आहे. सल्या चेप्याच्या सुरवातीच्या काळातील त्याचा सगळा खर्च मटका बुकीच करत होता. त्यानंतही अनेकदा सल्याच्या व त्याच्या टोळीच्या गरजा मटका बुकीने भागविल्याचे वास्तव स्वीकारावेच लागेल. गुंडांच्या टोळ्यांची गाठ मटक्‍याच्या थेट आर्थिक उलाढालाशी आहे, त्यावर आता पोलिस खात्याला ठोस उपाय करावेच लागणार आहेत. अन्यथा कऱ्हाडचे सामाजिक स्वास्थ्य हरवणार आहे. पोलिस खात्याला चांगले काम करण्याच्या अनेक संधी असतात. मात्र, पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात. सध्या तीच अवस्था कऱ्हाडच्या पोलिसांमध्ये आहे. त्या सगळ्यांचा परिपाक म्हणूनही मटक्‍याचा बाजार वाढला आहे. त्या बाजाराला कवेत घेण्यासाठी टोळ्या सरसावताहेत. त्यातून टोळीयुद्धसदृश स्थिती निर्माण होते आहे. सल्या चेप्याच्या टोळीपासून अलीकडच्या जुनेद शेख, पवन सोळवंडेपर्यंतच्या गुंडांच्या टोळ्या मटक्‍याच्या पैशालाच अधोरेखित करत वाढल्या आहेत. वाढतही आहेत. त्यामुळे गुंडांच्या टोळ्यांची ताकद मटक्‍यासारख्या व्यवसायात आहे. त्याचा समूळ नाश करण्यासाठी पोलिस नेमकी काय भूमिका घेणार, यावर सारे भवितव्य अवलंबून आहे. 


...अशी आहे स्थिती 
* कऱ्हाडच्या गुंडगिरीचे मटक्‍याच्या उलाढालीशी थेट संबंध 
* मटक्‍याला मोकळीक अन्‌ अर्थपूर्ण संबंधही पोलिसांना भोवले 
* अमाप पैसा पुरवून मटका बुकींनी पोसल्या अन्‌ वाढविल्या गुंडांच्या टोळ्या 
* बंदच्या नावाखाली कऱ्हाडला मटका खुलेआम सुरू 
* बुकींकडून जास्त पैसा घेण्यावरून टोळ्यांमध्ये वाढतोय वर्चस्ववाद 
* पैसा पुरवणाऱ्या मटका बुकीला टोळ्यांकडून दिला जातोय सन्मान 
* गुंडांच्या टोळ्यांसह मटका बुकींशी पोलिसांचे आर्थिक लागेबांधे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com