मतमोजणीसाठी २५०० पोलिसांचा बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

सांगली - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानावेळी काही ठिकाणी हाणामारी आणि वादाचे प्रसंग घडल्यामुळे मतमोजणीसाठीही कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणीच्या बंदोबस्ताची आज पोलिस ठाणेस्तरावर रंगीत तालीम घेण्यात आली. दहा तालुक्‍यांत दहा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त कार्यरत राहील.

सांगली - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानावेळी काही ठिकाणी हाणामारी आणि वादाचे प्रसंग घडल्यामुळे मतमोजणीसाठीही कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणीच्या बंदोबस्ताची आज पोलिस ठाणेस्तरावर रंगीत तालीम घेण्यात आली. दहा तालुक्‍यांत दहा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त कार्यरत राहील.

जि. प. आणि पं. स. निवडणुकीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुरशीने मतदान झाले. पैसे वाटप करताना गुन्हे दाखल झाले. जमावबंदी आदेशाचा भंग, तसेच हाणामारीप्रकरणीही गुन्हे दाखल झाले. अनेक मतदान केंद्रावर वादावादीचे प्रसंग घडले. हमरी-तुमरी शिवीगाळीचे प्रकारही घडले. त्यामुळे मतमोजणी आणि निकालानंतर वादाचे प्रकार घडू नये म्हणून पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

मतदानासाठी जिल्ह्यात ३ हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच दारू, पैसे वाटपावर कारवाईसाठी ३० पथके कार्यरत होती. तसेच राखीव पोलिस बंदोबस्तही सज्ज ठेवला होता. मतमोजणीसाठीही सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. दहा तालुक्‍यांत दहा ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उपाधीक्षकांच्या नेतृत्वाखाली दहा ठिकाणी पोलिस बंदोबस्त कार्यरत राहील. राज्य राखीव दलाची एक कंपनी देखील मदतीसाठी सज्ज झाली आहे. त्याशिवाय स्ट्रायकिंग फोर्स, राखीव स्ट्रायकिंग फोर्सही आहे. संभाव्य त्रासदायक गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात राहील.जिल्ह्यातील २१ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होत आहे. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर आज दुपारी सर्व पोलिस ठाणेस्तरावर बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली. मतमोजणी आणि निकालानंतर काय खबरदारी घ्यावी, याच्या सूचना अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या. तसेच पोलिसांना बंदोबस्ताची ठिकाणे ठरवून देण्यात आली. नागरिकांच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाकडील ०२३३-२६७२१०० हा दूरध्वनी क्रमांक कार्यरत ठेवला आहे.

Web Title: police bandobast for vote counting