कारवाई नको, वाहतूक नियंत्रण करा!

Police
Police

कऱ्हाड - सैदापूर कृष्णा कॅनॉल चौकात वाहतुकीचा ताण असताना वाहतूक नियंत्रणापेक्षा वाहतूक पोलिस कारवाईत मग्न असल्याने कोंडीमध्ये अधिक भर पडते. त्यामुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत कारवाईपेक्षा वाहतूक नियंत्रणाला प्राधान्य देण्याची मागणी होत आहे. वरिष्ठांनीही त्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देण्याची गरज आहे. 

बारावीच्या परीक्षेला कालपासून प्रारंभ झाला. परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोचावे, यासाठी पालकांसह परीक्षार्थींमध्ये धागधूग असते. मात्र, येथील कृष्णा नदीवर सुरू असलेल्या पुलाचे काम, तसेच ऊस वाहतुकीमुळे सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पालकांची चिंता वाढत आहे. कृष्णा कॅनॉल चौकात बेशिस्तपणे होणारी वाहतूक नेहमीच कोंडीला निमंत्रण देणारी ठरते.

त्यात सध्या नवीन कृष्णा पुलाचे सुरू असलेले काम, ऊस वाहतुकीमुळे त्यात भर पडते. चौकात वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात असतानाही अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची तारांबळ उडते. बहुतेकदा चौकात तैनात पोलिस वाहनांवरील कारवाईत मग्न असल्याचे दिसून येते. त्यामुळे कारवाईसाठी एखाद्या अडवलेल्या वाहनामुळे वाहतूक कोंडीत वाढ होते. वास्तविक सकाळी व सायंकाळी शाळा, महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत वाहतूक पोलिसांकडून कारवाईपेक्षा वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. मात्र, अनेकदा तसे होताना दिसत नसल्याने वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त होत आहेत. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस पालकांच्या मोटारसायकल, चारचाकी वाहनांमुळे या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होते. त्यादरम्यान वाहतूकचे नियंत्रण होणे आवश्‍यक आहे. कालपासून बारावीच्या परीक्षेस प्रारंभ झाला असून, वाहतूक शाखेने कृष्णा कॅनॉल चौकासह शाळांकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्व रस्त्यावरील वाहतुकीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. वरिष्ठांनीही त्याची दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी वाहनधारक, तसेच पालकांतून होत आहे.

सैदापूर चौकात वाहतूक पोलिस नेहमी वाहनांवर कारवाई करताना दिसतात. मात्र, शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस, तसेच परीक्षा कालावधीत पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षेला पोचणे शक्‍य होईल.
- बी. डी. माळी, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com