अभिजित बिचुकलेवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

बिचुकलेने मतदान केंद्रात रांग मोडून शिरुन तेथे मोबाईलवर शूटिंग केले.

सातारा : येथील शिर्के शाळेतील मतदान केंद्रावर बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असलेल्या गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत सागर सयाजी काळभोर (वय 30, रा. पाल, ता. कऱ्हाड) या गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. काल विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान होते. त्यासाठी काळभोर याची शिर्के शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर नियुक्ती केली होती. मतदान केंद्रावर महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लावून, एकेकाला आत सोडणे, त्याचबरोबर शंभर मीटर अंतराच्या आतमध्ये कोणाला मोबाईलवर चित्रीकरण करून न देणे व मोबाईलवर बोलण्यास प्रतिबंध करण्याचे काम तो करत होता.
 
साडेनऊच्या सुमारास तो मतदान केंद्राच्या खोलीजवळ उभा होता. त्या वेळी अभिजित बिचुकले रांगेत उभा न राहता पत्नीसह पुढे आला. त्याला त्याने रांगेतून येण्यास सांगितले. त्याने सागर यांना काठी का बाळगली याबाबाबत मोठ्याने विचार करत शिवीगाळ व दमदाटी केली. त्या वेळी तेथील इतर पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु न ऐकता बिचुकले मतदान केंद्रात रांग मोडून शिरला. तेथे मोबाईलवर शूटिंग केले. अशा प्रकारे त्याने शिवीगाळ व दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणल्याचे काळभोर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police files a complaint against Abhijit Bichukale