जिल्ह्यात पोलिसांना मिळणार नवीन घरकुले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

सांगली - जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी १८०२ निवासस्थाने मंजूर झाली आहेत. तसेच ११ पोलिस ठाण्याच्या बांधकामास देखील मंजुरी मिळाली. तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मार्च २०१८ अखेर बांधकामे पूर्ण होतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली - जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी १८०२ निवासस्थाने मंजूर झाली आहेत. तसेच ११ पोलिस ठाण्याच्या बांधकामास देखील मंजुरी मिळाली. तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मार्च २०१८ अखेर बांधकामे पूर्ण होतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिंदे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी २० प्रस्ताव पोलिस महासंचालकांमार्फत राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले होते. पहिल्या टप्प्यात ६८२ निवासस्थाने नुकतीच मंजूर झाली होती. त्यानंतर आतापर्यंत २० पैकी १७ ठिकाणचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी ४५ आणि कर्मचारी १७५७ निवासस्थाने याप्रमाणे १८०२ निवासस्थाने मंजूर करण्यात आली आहेत. त्यासाठी आर्किटेक्‍ट व प्रकल्प व्यवस्थापक यांची नियुक्ती झाली आहे.’’

शिंदे म्हणाले, ‘‘राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. डी. मिश्रा व अधीक्षक अभियंता अरुणकुमार खोत यांनी १८०२ निवासस्थानाबरोबर जिल्ह्यात ११ पोलिस ठाण्याचे बांधकाम करण्यासही मंजुरी दिली आहे. प्लॅन आणि इस्टिमेटनंतर तीन महिन्यांत निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन बांधकामास सुरवात होईल. मार्च २०१८ पर्यंत बांधकामे पूर्ण केली जातील. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टू बीएचके फ्लॅटस्‌ बांधले जाणार आहेत. एका फ्लॅटसाठी अंदाजे २५ ते ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. निवासस्थानाबरोबरच हॉस्पिटल, बालवाडी इमारत आदी अतिरिक्त बांधकामे देखील पूर्ण केली जातील.’’

पोलिस ठाणे नवीन इमारती
सांगली शहर, मिरज शहर, महात्मा गांधी चौक, कुंडल, कवठेमहांकाळ, पोलिस मुख्यालय, उमदी, कोकरूड, आटपाडी, खानापूर, कुरळप आदी ठिकाणी नवीन इमारती बांधल्या जातील.

निवासस्थाने अशी
सांगली शहर- १९०, मिरज शहर- १७८, महात्मा गांधी चौक- ८०, शिराळा- ५६, कुंडल- ४७, कडेगाव- ५८, कवठेमहांकाळ- ७५, पोलिस मुख्यालय- ६४१, जत- ८४, उमदी- ७२, कोकरूड- ५८, आटपाडी- ३६, पलूस- ४८, चिंचणी-वांगी- ४८, आष्टा- ४८, खानापूर- ४८, कुरळप- ३५ याप्रमाणे १८०२ निवासस्थाने बांधली जातील.

Web Title: Police get new gharkul