बलात्कार प्रकरणी पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस निलंबित 

संतोष कणसे
Monday, 7 September 2020

स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन करतो, असे सांगून तरुणीवर बलात्कार केल्यानंतर पसार असलेला कडेगाव पोलिस ठाण्याचा निरीक्षक विपीन हसबनिस याला निलंबित केले आहे.

कडेगाव (जि . सांगली ) : स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन करतो, असे सांगून तरुणीवर बलात्कार केल्यानंतर पसार असलेला कडेगाव पोलिस ठाण्याचा निरीक्षक विपीन हसबनिस याला निलंबित केले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ही निलंबनाची कारवाई केली. 

माझी पत्नी तुला एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन करेल, अशी बतावणी करुन हसबनिसने तरुणीला कडेगाव येथे बंगल्यात नेऊन अत्याचार केला, तशी फिर्याद पीडितेने हसबनिसविरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात दिली. हसबनिसविरुद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हसबनिस पसार होता. पोलिसांकडून अटक व निलंबनाची कारवाई न झाल्याने अनेक संघटनांनी टीका करण्यास सुरवात केली होती. त्याबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना पाठवला होता. विपीन हसबनीसला कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सेवेतून निलंबित केले. 

या गुन्ह्याचा तपास उपाधीक्षक कृष्णात पिंगळे हे करीत आहेत. तपासात घटनास्थळ पंचनामा, महत्त्वाचे साक्षीदार यांचे जबाब घेण्यात आले आहेत. फिर्यादीचा न्यायालयासमोर जबाब नोंदवण्यात आला आहे. महत्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. 

संशयित विपीन हसबनीसचा शोध सुरु आहे. पोलिस अधीक्षक शर्मा व अपर अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शानाखाली संशशियतांच्या शोधासाठी इस्लामपूर येथील व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील दोन पथके तयार करण्यात आलीत. घरी, नातेवाईकांचे घरी व सापडेल अशी ठिकाणी शोध मोहिम सुरु असल्याचे सांगण्यात आले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Inspector Vipin Hasbanis suspended in rape case