आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने बिघडले पोलिसांचे जीवनचक्र! 

परशुराम कोकणे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

सोलापूर - जनतेच्या सुरक्षेसाठी ऑन ड्यूटी चोवीस तास दक्ष राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. भरती होताना शारीरिक क्षमता पाहून संधी मिळालेल्या पोलिसांची आजची स्थिती फारच धक्कादायक आहे. अनेक पोलिसांना त्वचारोग, मूळव्याध आणि श्‍वसनाचे आजार असल्याचे समोर आले आहे. 

सोलापूर - जनतेच्या सुरक्षेसाठी ऑन ड्यूटी चोवीस तास दक्ष राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. भरती होताना शारीरिक क्षमता पाहून संधी मिळालेल्या पोलिसांची आजची स्थिती फारच धक्कादायक आहे. अनेक पोलिसांना त्वचारोग, मूळव्याध आणि श्‍वसनाचे आजार असल्याचे समोर आले आहे. 

पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नुकतेच पोलिस मुख्यालयात हरित वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजिण्यात आले होते. डॉ. शिवरत्न शेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करून आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी हे सांगितले. शिबिरातील नोंदीनुसार, आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिस वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी त्रस्त असल्याचे समोर आले आहे. 

हे आजार उद्‌भवले... 
- बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पोलिस दहा तासांहून अधिक वेळ रस्त्यावर थांबतात. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि धुळीमुळे पोलिसांना श्‍वसनाचे आजार झाले आहेत. त्यासोबतच अनेकांना त्वचेचा आजार झाल्याचे दिसून आले. 
- वेळी-अवेळी जेवण, मिळेल ते खाणे, व्यसनाधीनता, पुरेशी झोप न घेणे यामुळे अन्नपचन प्रक्रियेत बिघाड होऊन अनेकांना मूळव्याधीचा त्रास होत आहे. 
- सातत्याने वाहनाचा वापर, बंदोबस्तासाठी रस्त्यावर तासन्‌तास थांबून राहणे, पोलिस ठाण्यात खुर्चीवर किंवा घरी गेल्यावर व्यवस्थित न बसणे. चुकीच्या पद्धतीने वाकणे, बसणे यामुळे मणक्‍याचा आजार अनेकांना झाला आहे. 

डॉक्‍टरांचे निरीक्षण 
- भरती होताना शारीरिक क्षमता पाहून नोकरीवर घेतलेल्या पोलिसांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. 
- बहुतांश पोलिस व्यायाम करीत नाहीत. आधीच अनेक आजार आणि त्यात पुन्हा व्यायामाकडे दुर्लक्ष यामुळे पोलिसांचे जीवनचक्रही बिघडून गेले आहे. 
- पोलिसांसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही जेवण आणि झोप वेळेवर होत नाही. त्यामुळे त्यांनाही अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. 

पोलिस रात्रंदिवस दक्ष राहून कर्तव्य बजावत असतात. बंदोबस्तासोबतच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस दहा तासांहून अधिक वेळ रस्त्यावर थांबतात. जेवण आणि झोप वेळेवर होत नसल्याने पोलिस वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असून ते प्रचंड ताणतणावाचे जीवन जगत आहेत. 
- डॉ. शिवरत्न शेटे 

Web Title: Police lifecycle failed because he neglected to health!