फिर्यादीसच केले "त्या' पोलिसांनी मॅनेज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

कोल्हापूर - 'वारणानगरातील चोरीमधील नऊ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात तक्रार मागे घेण्यासाठी सांगली पोलिसांतील संशयितांनी फिर्यादी झुंजार सरनोबतला 18 लाख रुपये रोख व 34 लाखांची मालमत्ता देऊ केली होती. अपहारातील रकमेतूनच दिलेली सोलापुरातील ही मालमत्ता आज (ता. 17) तपास अधिकाऱ्यांनी सील केली. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला असून, संशयित पोलिसांना कोणत्याही क्षणी अटक करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकेल,'' अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यानिमित्ताने संशयित पोलिसांनीच आपल्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीलाच मॅनेज करावयाचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.

वारणानगर येथील शिक्षक कॉलनी, बिल्डिंग क्रमांक 5 मधील फ्लॅट क्रमांक 3 मधून मैनुद्दीन मुल्लाने 8 मार्च 2016 च्या रात्री सुमारे तीन कोटी 28 लाख रुपयांची चोरी केली होती. सांगली पोलिसांनी चोरट्यास अटक केल्यानंतर तपासादरम्यान सुमारे 9 कोटी 18 लाख रुपयांची रक्कम हडप केल्याचे उघड झाले आहे. फिर्यादी झुंजार सरनोबतच्या तक्रारीनुसार अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आणि सांगलीतील अपर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी तपास केला. या तपासात खुद्द पोलिसांनीच पैशांवर डल्ला मारल्याची माहिती पुढे आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने तपास करून याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी ती पोलिस महासंचालकांकडे पाठविली आहे.

पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, शरद कुरळपकर, पोलिस हेड कॉनस्टेबल दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील या सात पोलिसांसह ज्याच्या बॅंक खात्यावर चोरीतील रक्कम जमा केली, तो प्रवीण भास्कर सावंत (रा. वासूद. जि. सोलापूर) याच्यावरही पोलिसांनी चोरी, ठकबाजी, कट रचण्याचे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य पाहून हा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित पोलिसांची चौकशी केली. पोलिसांचे कॉल डिटेल्स, संभाषण, लोकेशन, बॅंक खात्यांमधील व्यवहार, आदींची माहिती घेऊन तपास केला. लुबाडलेली रक्कम पोलिसांनी वाहन खरेदी, फ्लॅट आणि प्लॉट खरेदीत गुंतवली आहे.

सोलापुरातील संपत्ती सील
अपहारातील काही अधिकाऱ्यांनी बंधकाम व्यवसायात भागीदारीही केल्याचे तपासात पुढे आले आहे. ही सर्व संपत्ती सील करण्यात येणार आहे. संशयितांपैकी प्रवीण सावंत याच्या बॅंक खात्यावरील 18 लाख रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील 34 लाख रुपयांची मालमत्ता आज पोलिस अधिकाऱ्यांनी जप्त केली.

सखोल तपास आवश्‍यक
कारवाई कुठंपर्यंत पोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. केवळ सांगली पोलिसच नव्हे, तर कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांतील अधिकारी आणि काही एजंटांचा या अपहारात सहभाग असल्याची चर्चा आहे. खरोखरच ही रक्कम किती होती, कोठून आली याची संपूर्ण माहिती पुढे येण्यासाठी तसाप सखोल पोचणे आवश्‍यक आहे.

एकूण रक्कम 14 कोटींची
अपहारातील रक्कम सुमारे 14 कोटींची असल्याची माहिती श्री. नांगरे-पाटील यांनी दिली आहे. यापैकी साडेतीन कोटी, दीड कोटी अशा टप्प्याटप्प्याने पुढे आली आहे. संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी संबंधित विभागांकडून होणारच आहे. त्यांचा तपास सुरू आहे. त्यांचा सखोल अहवाल मिळाल्यानंतरच नेमका अपहार किती, चोरीची रक्कम किती, हे स्पष्ट होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: police manage to plaintiff