विनापरवाना दुचाकी स्पर्धेवर पोलिसांची धाड; 30 गाडया जप्त; 71 स्वार पळाले

घनशाम नवाथे 
Saturday, 26 December 2020

सांगलीवाडीतील चिंचबागेत आज विनापरवाना दुचाकीच्या सौंदर्य स्पर्धा, सायलेंन्सर काढून स्पर्धा असा प्रकार सुरू असताना सांगली शहर पोलिसांनी दुपारी धाड टाकली.

सांगली : सांगलीवाडीतील चिंचबागेत आज विनापरवाना दुचाकीच्या सौंदर्य स्पर्धा, सायलेंन्सर काढून स्पर्धा असा प्रकार सुरू असताना सांगली शहर पोलिसांनी दुपारी धाड टाकली. त्यामुळे स्पर्धक आणि प्रेक्षकांची एकच पळापळ झाली. सर्वत्र गोंधळ उडाला. पोलिसांनी 16 जणांना ताब्यात घेऊन घटनास्थळी 30 दुचाकी जप्त केल्या. तर 71 दुचाकीस्वार पलायनात यशस्वी झाले. परंतू पोलिसांनी त्यांच्या दुचाकीचे क्रमांक टिपून घेतले आहे. 

पोलिसांनी धाडीनंतर मंडप मालक, आयोजन समिती आणि अविनाश कटरे, अनिकेत लोंढे (सांगलीवाडी) यांच्यावर विनापरवाना स्पर्धा, मोटारवाहन कायदा आणि मुंबई पोलिस ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगलीवाडीतील चिंचबागेत आज दुपारी 12 च्या सुमारास विना परवाना दुचाकींच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मॉडीफॉय केलेल्या आणि दुचाकीच्या सायलेंसरमध्ये बदल केलेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या दुचाकीस्वारास तीन हजाराचे रोख पारितोषिक व ढाल बक्षिस दिली जाणार होती.

स्पर्धेसाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दुचाकीस्वार मोठ्या संख्येने आले होते. तसेच प्रेक्षकांची गर्दी देखील झाली होती. सायलेंन्सर काढलेल्या दुचाकीचा गोंगाट आणि स्पर्धा यामुळे गोंधळ उडाला होता. 
सांगली शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी दीपक कांबळे यांना या प्रकाराची माहिती. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांना हा प्रकार समजताच सहाय्यक निरीक्षक निलेश बागाव यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक बागाव यांच्या पथकाने तत्काळ पोलिस पथकासह तेथे धाड टाकली.

पोलिस पाहून स्पर्धक आणि प्रेक्षकांची पळापळ सुरू झाली. पोलिसांनी 16 जणांना ताब्यात घेतले. स्पर्धेसाठी आलेल्या 30 दुचाकी पकडून ठेवल्या. पोलिसांचे संख्याबळ अपुरे असल्यामुळे 71 दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी ठरले. तरीही सर्वांच्या दुचाकीचे क्रमांक पोलिसांनी टिपून ठेवले आहेत. दुचाकीस्वारांना पकडून ठेवल्यानंतर पोलिस ठाणे आवारात गर्दी जमली होती. तरूणांचे नातेवाईकही गोळा झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा नोंदवला आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

प्राथमिक तपासात 16 जणांना ताब्यात घेतले आहे. दुचाकी क्रमांकावरून आणि चौकशीनंतर इतरांवर गुन्हा नोंदवला जाईल, असे सहाय्यक निरीक्षक बागाव यांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raid on unlicensed bike race; 30 vehicles seized; 71 riders fled