पोलिसच निघाला दरोडेखोरांचा म्होरक्‍या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

किराणा मालाच्या गोदामावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या चक्क एक पोलिसच असल्याचे समोर आले आहे. पोलिस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड असे त्याचे नाव आहे. तो पुणे जिल्हा पोलिस दलात कार्यरत असल्याचे समजले. या गुन्ह्याचा ठपका ठेवत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गायकवाड याच्यावर निलंबनाची कारवाई केली.

निघोज (जि. नगर) - किराणा मालाच्या गोदामावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या चक्क एक पोलिसच असल्याचे समोर आले आहे. पोलिस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड असे त्याचे नाव आहे. तो पुणे जिल्हा पोलिस दलात कार्यरत असल्याचे समजले. या गुन्ह्याचा ठपका ठेवत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गायकवाड याच्यावर निलंबनाची कारवाई केली.

याबाबत निघोज येथील प्रदीप ताराचंद गांधी यांनी फिर्याद दिली. पोलिस नाईक गायकवाड व त्याच्या चार साथीदारांनी रविवारी (ता.१९) रात्री यांच्या गांधी यांचे गोदाम फोडून पाच लाख ९६ हजार ५० रुपयांचे साहित्य पळविले होते. हा सर्व प्रकार मळगंगा देवी मंदिराच्या ‘सीसी टीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावेळी पोपट गायकवाड याने मंदिराच्या सुरक्षारक्षकाला ‘मी सीबीआयचा माणूस असून, येथे आपण माल नेण्यास आलो आहोत,’ असे त्याने सांगितले.

सुरक्षारक्षकाला संशय आल्याने, गायकवाड याचे सर्व बोलणे त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले; मात्र हा दरोड्याचा प्रकार असल्याचे सुरक्षारक्षकाला समजले नाही. दुसऱ्या दिवशी दरोड्याची चर्चा सुरू झाल्यावर त्याने मोबाईलमधील रेकॉर्डिंग पोलिसांना दिले. मंगळवारी (ता. २१) रात्री उशिरा पारनेर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Robber Chief Crime