विखेंच्या ताफ्यातील पोलिस व्हॅन दरीत कोसळली

मार्तंड बुचुडे
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

तालुक्‍यात परतीच्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरिपाबरोबरच रब्बीची पिकेही नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आज पारनेर तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले होते.

पारनेर (नगर) ः भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील पारनेर दौऱ्यावर आले असताना त्यांच्या समवेत सुरक्षेसाठी असलेल्या श्‍वानपथकाच्या पोलिस व्हॅनला अपघात झाला. या अपघातात पोलिस उपनिरीक्षक बालाजी पदमणे यांच्यासह व्हॅनमधील पोलिस कर्मचारी जखमी झाले. अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला असून, त्याचा पाय मोडला आहे.

तालुक्‍यात परतीच्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरिपाबरोबरच रब्बीची पिकेही नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आज पारनेर तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले होते. खासदार विखे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करीत होते. त्यांनी तालुक्‍यातील काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.

हा पाहणी दौरा सुरू असताना त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी त्यांच्या समवेत एक पोलिस पथक तैनात करण्यात आले होते. सर्व पोलिस कर्मचारी एका व्हॅनमध्ये बसून त्यांच्या समवेत प्रवास करीत होते. हा प्रवास सुरू असताना पोलिस व्हॅनला अपघात झाला. पिंपळगाव रोठे येथील कोरठण खंडोबा मंदिराजवळील गारखिंडी घाटात हा अपघात झाला. व्हॅनचा रॉड तुटल्याने ती खोल दरीत गेली. चालकाने प्रयत्न करूनही ती थांबली नाही. पलट्या खाऊन दरीत जाऊन पडली.

या अपघातात चालक पोपट मोकाते गंभीर जखमी झाले. त्यांचा पाय मोडला. पोलिस उपनिरीक्षक पदमणे यांना जबर मार लागला आहे. व्हॅनमध्ये पोलिस व गृहरक्षक दलाचे जवान होते. प्राथमिक माहिती मिळालेली नाही. मात्र, जखमींमध्ये एका महिला जवानाचा समावेश आहे. चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. व्हॅन उलटल्याने पदमणे बाहेर पडले. मात्र, इतर कर्मचारी व्हॅनसह थेट खोल दरीत गेले. सर्व जण जखमी झाले.

सर्व जखमी पोलिसांना तातडीने अळकुटी व टाकळी ढोकेश्‍वर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यात एका पोलिसाला जास्त दुखापत झाली असून, उरलेल्या पोलिसांना कमी दुखापत झाली आहे. गंभीर जखमी व्हॅनचालकाला तातडीने नगरजवळील विळद घाटातील विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खासदारांनी केले प्रथमोपचार

सर्व जखमींवर स्वतः खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी प्रथमोपचार केले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. गोपीनाथ घुले या पिंपळगाव रोठेच्या नागरिकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police van in the wreckage of the van collapsed in the valley