राज्यात प्रथमच पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र पोलिसिंग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला. यासाठी शहरात चार ठिकाणी तात्पुरते मंडप उभारण्यात आले असून तिथे वारकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व मदत व माहिती दिली जाणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय आणि काही सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून आज कार्यान्वित झाला असून त्याचे वारकर्यां मधून स्वागत होत आहे.

पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला. यासाठी शहरात चार ठिकाणी तात्पुरते मंडप उभारण्यात आले असून तिथे वारकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व मदत व माहिती दिली जाणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय आणि काही सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून आज कार्यान्वित झाला असून त्याचे वारकर्यां मधून स्वागत होत आहे.

पंढरपुरात यात्रेत लाखोंच्या संख्येने वारकरी येतात. अनेकांना निवासाची व्यवस्था असलेला मोठ, धर्मशाळा, लॉज या विषयाची नेमकी माहिती नसते. गर्दीमुळे अनेकांची चुकामुक होते तर काहीजणांचे खिसे कापले जातात. काहीवेळा सामानाची देखील चोरी होते. त्यामुळे वारकरी गोंधळून जातात. पोलिस ठाणे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच प्रमुख दवाखाने कुठे आहेत याविषयी नेमकी माहिती त्यांना नसते. त्यामुळे भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागते.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे काही वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी यात्रांच्या काळात बंदोबस्त करताना त्यांना वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात आल्या सोलापूर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून नव्याने सूत्रे हाती घेतल्यावर पंढरपुरात तीर्थक्षेत्र पोलिस संकल्पना राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांच्या सूचनेनुसार पंढरपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सागर कवडे, पोलिस निरीक्षक राजेश गवळी व अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी आवश्यक माहिती संकलित केली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले, श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.पी. रोंगे आणि काही सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून आज पासून शहरात नवीन बसस्थानक शिवाजी चौक अंबाबाई मैदाने आणि सांगोला रोड अशा चार ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला.

या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी पोलिस अधीक्षक पाटील मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कवडे, पोलिस निरीक्षक गवळी, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी मनोगते व्यक्त केली. या उपक्रमात सहभागी झालेल्या जिजाऊ शैलेंद्र साळुंखे या विद्यार्थिनीने या उपक्रमाची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत भोसले यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Policing in Pandharpur area first time in the state