मुंबईतील राजकीय भूकंपाचे कोल्हापूर जिल्ह्यात धक्के 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

कोल्हापूर - राज्यातील राजकीय भूकंपाची बातमी सकाळी येऊन धडकली अन्‌ जिल्ह्यातील राजकीय गोटात मोठी अस्वस्थता पसरली. भाजप वगळता शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी बातमी धक्का देणारी ठरली. शहरासह जिल्ह्यात नाट्यमय घडामोडीचे पडसाद उमटले. 

काल रात्रीपर्यंत महाविकासआघाडीचे सरकार येणार, अशी शक्‍यता असताना साखर झोपेत असलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि राजकीय कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांच्याही भुवया उंचावल्या.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (ता. 24) महिना होत असताना अनपेक्षित अशी ब्रेकिंग न्यूज आल्याने तिन्ही पक्षांचे पदाधिकारी हडबडून गेले. अजित पवार भाजपकडे गेल्यानंतर जिल्ह्यातील बडे राजकीय नेते आमदार हसन मुश्रीफ कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले होते. दुपारी झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत मुश्रीफ त्यांच्या मागे बसल्याचे चित्र नजरेस पडले आणि अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुरुवातीपासून शरद पवार यांना मानणारे आहेत. पवारांमुळे अजित पवारांसंबंधी उघडपणे कोणी बोलत नव्हते. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत आज संतापाची लाट होती; मात्र उघडपणे बोलण्यास कुणी तयार नव्हते. 

राष्ट्रवादीची अशी स्थिती असताना सेनेच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली. काल रात्रीपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, यामुळे सगळे आनंदात होते. आज सकाळी मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. काय बोलावे आणि कुणाबद्दल बोलावे, हेच काही त्यांना समजत नव्हते. कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मुंबईतील घडामोडींवर लक्ष ठेवून होते. 
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपले नेते मंत्री होणार, या आशेवर होते. दोन्ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची अवस्था सकाळच्या घटनेमुळे विचित्र झाली. 

नजरा मुंबईकडे 

आमदार सर्वश्री हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील. सतेज पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे हेही घडामोडीत आहेत. सर्वांना संपर्कासाठी कार्यकर्ते फोन करत होते. आमदार प्रकाश आवाडे, तसेच विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या गोटात सकाळी उत्साहाचे वातावरण पसरले. मात्र, मुंबईतील घडामोडींवर तेही लक्ष ठेवून होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Crises In Mumbai Hits Kolhapur District