ऐक्‍य परिषदेत समतेचा नारा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - इतर समाजाची आरक्षणे सुरक्षित ठेवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (ऍट्रॉसिटी) दुरुपयोग करणाऱ्या उभयतांवर कारवाई करावी, जाती प्रबळ करणारी आंदोलने, मोर्चे थांबवून समाजाचे ऐक्‍य अबाधित ठेवण्याचा कृती संकल्प करावा, असे महत्त्वपूर्ण ठराव आज मराठा-दलित ऐक्‍य परिषदेत मांडत समतेचा संदेश दिला. 

कोल्हापूर - इतर समाजाची आरक्षणे सुरक्षित ठेवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (ऍट्रॉसिटी) दुरुपयोग करणाऱ्या उभयतांवर कारवाई करावी, जाती प्रबळ करणारी आंदोलने, मोर्चे थांबवून समाजाचे ऐक्‍य अबाधित ठेवण्याचा कृती संकल्प करावा, असे महत्त्वपूर्ण ठराव आज मराठा-दलित ऐक्‍य परिषदेत मांडत समतेचा संदेश दिला. 

त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी व्यासपीठावरून सामाजिक ऐक्‍याचा हा नारा बुलंद केला. 

रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटातर्फे ही राज्यव्यापी परिषद येथील सासने मैदानावर खासदार आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपस्थित नेत्यांनी केलेल्या भाषणात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे, असा ठळक उल्लेख केला. तसेच ऍट्रॉसिटीचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावे, असेही आवाहन यावेळी सर्वच नेत्यांनी केले. 
 

दोन्ही समाजातील जातीय सलोखा, सामाजिक ऐक्‍य कायम राहावे म्हणून राज्यव्यापी ऐक्‍य परिषदेचे आयोजन केल्याचे आरपीआयतर्फे सांगण्यात आले. 

आठवले म्हणाले, ""राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. समाजातील अशक्त लोकांना सशक्त बनविण्याचे काम शाहू महाराज यांनी केले. ज्यावेळी मराठा समाज आरक्षण मागत नव्हता त्यावेळी आपण त्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही केली होती. आर्थिक निकषावर आधारित आरक्षण द्यायचे कसे हा प्रश्‍न आहे. 50 टक्‍क्‍यांच्या वर आरक्षण द्यायचे नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. यासाठी संसदेत व संविधानामध्ये कायदात दुरुस्ती करावी लागेल.'' 

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ""मराठा समाजाच्या मोर्चातून झालेली आरक्षणाची मागणी ही योग्य आहे. इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले जावे, अशीच ती मागणी आहे. ऍट्रॉसिटीचा गैरवापर होऊ नये, अशी तुमची जशी भूमिका आहे, तशीच मराठा समाजाची भूमिका आहे. मराठवाड्यात अजूनही जाती विषमता आहे. ही विषमता दूर करण्यासाठी अशा बहुजन परिषदेची गरज आहे.'' 

डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, ""मराठा आणि दलित समाजाचे ऐक्‍य ही काळाची गरज आहे. शाहू महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांच्या उन्नतीसाठी पुढाकार घेतला. मराठा आणि दलित समाजाचे ऐक्‍य ही काळाची गरज आहे.''

Web Title: Political unity conference