सदाभाऊंना कळ, जिल्हा बॅंकेत वळवळ

अजित झळके
सोमवार, 5 डिसेंबर 2016

सांगली - सदाभाऊ अन्‌ दिलीपतात्या तसे खासम्‌खास दोस्त... राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचं राजकारण म्हणजे विळ्या-भोपळ्याची जोडी असताना राजकारणापलीकडं या दोघांचं अंडरस्टॅंडिंग... तरीपण तात्यांनी ‘सदू’ला कळ यावी असा ठोसा का लगावला, याचं कोडं दोन्हीकडं पडलंय. महिनाभरात राज्याला दुसरी ‘ब्रेकिंग’ देऊन तात्या मात्र चर्चेत आले आहेत. 

सांगली - सदाभाऊ अन्‌ दिलीपतात्या तसे खासम्‌खास दोस्त... राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचं राजकारण म्हणजे विळ्या-भोपळ्याची जोडी असताना राजकारणापलीकडं या दोघांचं अंडरस्टॅंडिंग... तरीपण तात्यांनी ‘सदू’ला कळ यावी असा ठोसा का लगावला, याचं कोडं दोन्हीकडं पडलंय. महिनाभरात राज्याला दुसरी ‘ब्रेकिंग’ देऊन तात्या मात्र चर्चेत आले आहेत. 

दिलीपतात्यांनी रिझर्व्ह बॅंकेविरुद्ध बॉक्‍सिंग ग्लोव्हज घालून आखाड्यात उडी घेतली अन्‌ मधूनच सदाभाऊंना ठोसे लावले. नेमकं असं कसं घडलं? यावरचा पडदा थोडा बाजूला सारल्यावर त्याची मुळं सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीपासून ते जिल्हा बॅंकेच्या ‘अस्थिर’ खुर्चीपर्यंत पसरलेली दिसतात. ती व्हाया इस्लामपूर नगरपालिका निवडणूक आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा जिल्हा बॅंकेत सत्कार सोहळा अशी विस्तारलेली आहेत. चाळीस वर्षांनंतर वाळव्याची हद्द ओलांडून सांगलीच्या राजकारणात आलेल्या तात्यांना आपला ‘पॉलिटिकल गेम’ करण्यासाठी जाळं पसरलं गेलंय, असं वाटतं. ते जाळं पसरवणारे त्यांच्याच पक्षातील आहेत. ‘हा मासा सहजासहजी गळाला लागणार नाही’, असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अर्थात सदूभाऊ चिडणार, हा सलही त्यांच्या मनात असावा.

थोडा ‘रिव्हर्स गिअर’ टाकून सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत गेल्यावर या संघर्षाची कारणे सापडतात. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. इथून दिलीपतात्या इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडं उमेदवारी मागितली होती. मुलाखत झाली, मात्र घोडं पैशात अडलं. खर्च करायची ऐपत किती, यावर तिकीट ठरलं, असं ते सांगतात. साताऱ्यातील शेखर गोरे यांना उमेदवारी दिली गेली. त्यावर तात्या तुटून पडले. ‘‘निष्ठा आणि चारित्र्यापेक्षा पैसा श्रेष्ठ आहे. राजकारणात दरोडेखोरांना पायघड्या घातल्या जातात’, असा हल्लाबोल करत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. आमदार जयंत पाटील यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी असताना तात्यांनी बाॅम्ब फेकला आणि व्हायचा तसा स्फोट झाला. गोरे भुईसपाट झाले. साहजिकच तात्याविरोधी ‘लॉबी’ने त्याचे मार्केटिंग सुरू केले होते. त्यात भर म्हणून सदाभाऊ खोत यांनी इस्लामपुरात या जखमेवरची खपली काढली. ‘‘सामान्य माणसाला आमदार करायची जयंतरावांची दानत असती तर दिलीप पाटील आमदार झाले असते’’, असा चिमटा काढून ते बाजूला झाले. रान पेटत गेलं.

दिलीपतात्यांवर आष्ट्याची जबाबदारी सोपवून त्यांना इस्लामपूरच्या शिवंबाहेरच ठेवलं गेलं. ज्या दिवशी निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला 
रामराम ठोकून विकास आघाडीत प्रवेश केला, त्याच दिवशी तात्यांनी सुरुंग लावला होता, हा दुसरा योगायोग. या जखमा भळभळत असतानाच इस्लामपूर नगरपालिका हातून गेली. जयंतरावांना घरच्या मैदानात पहिल्यांदा असा पराभव पत्करावा लागला. त्याची कारणमीमांसा करताना तात्या विरोधकांनी पराभवाच्या यादीत तात्याचं ते विधान आवर्जून घातलं. हा दंगा शांत व्हायच्या आत निशिकांत पाटील जिल्हा बॅंकेत दाखल झाले अन्‌ ‘‘नगराध्यक्ष होण्यात तात्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरला’, असे आवर्जून सांगितले. ही बातमी वणवा पेटावा तशी वाळवा तालुक्‍यात पसरली. राष्ट्रवादी विरोधकाचा सत्कार, हे भांडवल करून तात्यांच्या जिल्हा बॅंक अध्यक्षपदाच्या खुर्चीखाली बाँब पेरला गेला. तो अजून तसाच आहे. 

तात्यांचा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न 
दिलीपतात्यांनी जिल्हा बॅंकेच्या मोर्चाच्या निमित्ताने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केल्याने ते राज्यभर चर्चेत आले. राष्ट्रवादीतील कट्टर स्वाभिमानी विरोधकांना हे ‘लय भारी’ वाटलं. शिवाय मी राष्ट्रवादीचाच असून सदाभाऊंसह (निशिकांत आलेच) सारे माझे विरोधक आहेत, असा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बॅंकेतील त्यांच्या कारकिर्दीला दीड वर्ष झाले, तूर्त त्यांना इथे स्पर्धक नसला तरी वर्षमर्यादेची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील विरोधकांना ते स्वयंचित (हिट विकेट) होतील, असे वाटते. अर्थात सदूभाऊला ठोसे लगावून ते सुरक्षित झालेत का, याचा फैसला सर्वस्वी जयंतरावांच्या हातात आहे.

Web Title: politics with sadabhau khot & dilip patil