विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यावरून रंगले राजकारण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

कागल -  ‘शाहू कारखान्याच्या कार्यालयाच्या प्रांगणात विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा उभा करण्यात येत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे; परंतु त्यासाठी कामगारांच्या पगारातून वीस टक्के व शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून रक्कम कपात करणे चुकीचे आहे. त्यांना राजेंचा पुतळा उभा करणे जमत नसेल, तर आम्ही निधी संकलन करून देऊ आणि निधी स्वीकारण्यास नकार दिला, तर पालिकेच्या माध्यमातून आम्ही राजेंचा पुतळा उभा करू,’ असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल -  ‘शाहू कारखान्याच्या कार्यालयाच्या प्रांगणात विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा उभा करण्यात येत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे; परंतु त्यासाठी कामगारांच्या पगारातून वीस टक्के व शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून रक्कम कपात करणे चुकीचे आहे. त्यांना राजेंचा पुतळा उभा करणे जमत नसेल, तर आम्ही निधी संकलन करून देऊ आणि निधी स्वीकारण्यास नकार दिला, तर पालिकेच्या माध्यमातून आम्ही राजेंचा पुतळा उभा करू,’ असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

पुतळा उभा करण्याकामी राष्ट्रवादीने मदत फेरी काढून निधी संकलनाचा प्रारंभ केला. गैबी चौक ते राममंदिरपर्यंत फेरी काढली. त्यामध्ये आमदार हसन मुश्रीफ, नगराध्यक्ष माणिक माळी, उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, प्रताप ऊर्फ भय्या माने, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, विकास पाटील, शिवानंद माळी, राजेंद्र माने, जयदीप पवार आदींसह नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘श्रीमंत जयसिंगराव ऊर्फ बाळ महाराज यांचा पुतळा विक्रमसिंह घाटगे यांनी स्वखर्चातून उभारला. त्या वेळी कर्मचाऱ्यांच्या पगारातून वर्गणी घेण्यास त्यांनी विरोध दर्शविला होता. आता मात्र विक्रमसिंहराजेंच्या पुतळ्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून तसेच शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून रक्कम कपात करणे चुकीचे आहे. राम मंदिरासाठी कर्मचाऱ्यांकडून अडीच हजार रुपये घेतले गेले आहेत. पालिकेकडून राम मंदिरासाठी सव्वा तीन कोटी दिले आहेत. त्यांनी राममंदिर  पालिकेकडे वर्ग करावे त्याची देखभाल करू.’’
प्रताप ऊर्फ भैय्या माने, प्रकाश गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

पुतळ्याचे राजकारण नको - शाहू ग्रुपचा इशारा

आमदार हसन मुश्रीफ यांनी  विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा उभारणीबाबत राजकारण करू नये. आम्ही पुतळा उभारण्यास सक्षम आहोत. त्यांनी राजकीय रंग देऊ नये, असा इशारा शाहू ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार बैठकीत दिला. दरम्यान, सायंकाळी येथील छत्रपती शिवाजी पुतळ्यासमोर शाहू ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी आमदार मुश्रीफ यांच्या निधी संकलन  फेरीचा निषेध केला.

कारखाना कार्यस्थळावर विक्रमसिंहांचा पुतळा  उभारण्याची मागणी सभासदांतून झाली. त्यास वार्षिक सभेत मंजुरी दिली आहे. शाहूचे व्यवस्थापन पुतळा उभारण्यास सक्षम आहे. आमदार मुश्रीफ यांना विक्रमसिंहराजेंनी राजकारणात आणले. पुतळ्यासाठी निधी गोळा करणे हे त्यांचे राजकीय ढोंग आहे. राजेंबद्दल  आदर असेल, तर त्यांनी राजेसाहेबांचा स्वतंत्र पुतळा उभा करावा आम्ही त्यांचे स्वागतच करू. कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा केला जातो, हे त्यांचे विधान दिशाभूल करणारे आहे. आमदार मुश्रीफ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारणार असल्याचा तालुक्‍याला शब्द दिला आहे. त्यात त्यांनी आधी लक्ष घालावे.’’

पत्रकार बैठकीला अमरसिंह घोरपडे, एम. पी. पाटील, नंदकुमार माकाळकर, विशाल पाटील, राजेंद्र जाधव,  बॉबी माने आदींसह कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळी आमदार मुश्रीफ यांच्या निषेधाची सभा घेतली. त्यात बाळासाहेब तिवारी म्हणाले,‘‘पुतळ्यासाठी पगारातून कपात केलेली नाही. राजकारणासाठी आमदार मुश्रीफ पराचा कावळा करीत आहेत.’’ राजेंद्र कारंडे, श्रीकांत कोरवी, संदीप नेर्ले आदींनी  मनोगत व्यक्त केले.

Web Title: Politics on the statue of Vikramsingh Ghatge