"छू मंतर' म्हटल्याने तलाव स्वच्छ होणार नाही!

परशुराम कोकणे
बुधवार, 11 एप्रिल 2018

सोलापूर - संभाजी तलाव स्वच्छ आणि सुंदर व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक आहे. शहरातील सामाजिक संस्था, चांगल्या लोकांनी एकत्र येऊन कृतिशीलता दाखविण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपला भार उचलला पाहिजे. संभाजी तलाव स्वच्छ राहावा, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. महापालिकेने "छू मंतर' म्हटल्यावर तलाव स्वच्छ होणार नाही. या प्रक्रियेत सर्वांनीच सहभागी झाले पाहिजे, असे मत महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले. 

संभाजी तलाव स्मार्ट सिटी योजनेत नाही, असे सांगून महापालिका आयुक्त ढाकणे म्हणाले, ""तलाव खराब करायचा नाही, असे प्रत्येकानेच ठरविले पाहिजे. मी एकदा त्या भागात जाऊन स्वच्छता केली आहे. दरवेळी मला जाणे शक्‍य नाही. लोकांनी एकत्र येऊन स्वच्छता ठेवायला हवी. त्या भागात फळांच्या गाड्या लावल्या जातात. अनेकदा त्यांच्यावर कारवाई केली.

त्याच्यावर समाजाचा दबाव असायला हवा. महापालिकेचे लक्ष नाही असे म्हणता येणार नाही. एकूणच, आपल्या समाजरचनेचा हा दोष आहे. वारंवार सांगूनही तलाव परिसरात कपडे धुणे थांबविले जात नाही. एके दिवशी तर महापालिकेने तलाव परिसरात कपडे धुणाऱ्या लोकांचे कपडे उचलून आणले. दंडाची कारवाईही त्यांच्यावर केली. तरीसुद्धा बदल होताना दिसत नाही. जे लोक घाण करत आहेत, त्या लोकांचे प्रबोधन करायला हवे.'' 

'सुशोभीकरणासाठी शासनाकडून पाच कोटी मंजूर झाले आहेत. सुशोभीकरणाचे काम कोणी करायचे, हे महाराष्ट्र पर्यटन विभाग ठरविणार आहे. त्या भागात सुशोभीकरणासोबतच स्वच्छतेची गरज आहे. तलावात जोपर्यंत घाण पाणी आहे, तोपर्यंत जलपर्णी येतच राहणार'' असेही महापालिका आयुक्त ढाकणे यांनी सांगितले. 

"रेल्वे विभागाकडून अपेक्षित सहकार्य नाही' 
संभाजी तलावात ड्रेनेजचे पाणी जायलाच नको. रेल्वे रुळामुळे काही ठिकाणी काम थांबले आहे. याविषयी स्वत: मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनीही पाठपुरावा केला आहे, मात्र अद्याप रेल्वे विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. रेल्वे रुळाच्या खालून काम करण्याचा अधिकार महापालिकेला नाही, असेही महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले. 

संभाजी तलावाच्या विकासाकरिता महापालिकेने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव साडेतेरा कोटींचा आहे. शासनाच्या काही शंका होत्या, त्यानुसार दुरुस्ती करून पुन्हा माहिती पाठविली आहे. तलाव घाण करणारे जर गावातीलच लोक असतील तर काय बोलायचे? तलावात कचरा टाकला जातोय. लोकांनी तलावातील पाण्यात कपडे धुऊ नयेत म्हणून फलक लावले, प्रत्यक्ष अनेकदा प्रबोधन केले तरीसुद्धा सुधारणा होताना दिसत नाही. 
- अविनाश ढाकणे, आयुक्त, सोलापूर महापालिका

Web Title: pond cleaning avinash dhakane