युवकांच्या सकारात्मक ऊर्जेने बदल घडेल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

विविध वक्ते : यिन, शिवाजी विद्यापीठातर्फे ‘समर यूथ समीट’ला प्रारंभ

कोल्हापूर - युवकांनो, तोंडात साखर आणि डोक्‍यावर बर्फ ठेवून काम केल्यास तुमच्या सकारात्मक ऊर्जेने समाजात बदल नक्कीच घडेल.

विविध वक्ते : यिन, शिवाजी विद्यापीठातर्फे ‘समर यूथ समीट’ला प्रारंभ

कोल्हापूर - युवकांनो, तोंडात साखर आणि डोक्‍यावर बर्फ ठेवून काम केल्यास तुमच्या सकारात्मक ऊर्जेने समाजात बदल नक्कीच घडेल.

राजकारणाकडे करिअर म्हणून न पाहता सामूहिकतेचा पुरस्कार करा आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन सामूहिक भावना बळकट करा, असा कानमंत्र विविध वक्‍त्यांनी आज येथे दिला.  निमित्त होते... डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘यिन समर समीट’चे. स्पेक्‍ट्रम अॅकॅडमी प्रस्तुत व नीलया एज्युकेशन ग्रुप पॉवर्ड बाय असणाऱ्या शिबिरासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व विद्या प्रबोधिनी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र यांचे सहप्रायोजकत्व आहे. वि. स. खांडेकर भाषा भवनात त्यास आज सुरुवात झाली.

किड्या-मुंग्याप्रमाणे मरायचे नाही

रांजना ग्रुप इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक जयसिंग चव्हाण यांनी ‘झिरो टू मिलियन सक्‍सेसफूल बिझनेस’ विषयावर संघर्षपूर्ण वाटचालीतून साधलेल्या यशाचे गमक स्पष्ट करत तरुणाईला प्रेरणा दिली. 

ते म्हणाले, ‘‘अठरा महिन्यांचा असताना असताना डॉक्‍टरांनी चुकीचे इंजेक्‍शन दिल्याने मी दोन्ही पाय गमावले. अठरा वर्षे घरीच होतो. त्यानंतर थेट दहावीची परीक्षा दिली आणि किड्या-मुंग्याप्रमाणे मरायचे नाही, हे ठरवून टाकले. डिटर्जंट विक्रीचा व्यवसाय सुरू केला. समाजकल्याण विभागाकडे ७० हजार रुपयांच्या निधीसाठी अर्ज केला. मात्र केवळ वीस हजार रुपयेच मिळाले. ते स्वीकारून व्यवसायास सुरुवात केली. कमी दरात उत्कृष्ट दर्जाचा माल देत राहिलो. 

माझ्या फॅक्‍टरीला आग लागल्यानंतरही स्थिर राहिलो.’’ ते म्हणाले, ‘‘सुमारे तीन हजार दिव्यांग लोकांसाठी ई-रिक्षा देऊन त्यांना स्वावलंबी बनविणार आहे. या रिक्षात फोटो स्टुडिओ, झेरॉक्‍स सुविधा असणार आहे. दिव्यांगांना करुणेची गरज नसून रोजगाराची आहे.’’ 
 

चुकीचे इंजेक्‍शन दिल्याने मी दोन्ही पाय गमावले
दिव्यांगाना करुणेची गरज नसून रोजगाराची आहे.
तीन हजार दिव्यांग लोकांसाठी ई-रिक्षा देऊन स्वावलंबी बनविणार

राजकारण सामूहिक कृत्य

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागातील डॉ. प्रकाश पवार यांनी ‘तरुणाई आणि राजकारण’ विषयावर नेमकेपणाने संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘राजकारण हे करिअरचे क्षेत्र आहे, असा समज संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभरात आहे. जे जे तरुण राजकारणाला करिअर म्हणून पाहायला हवे, असे मानतात. मात्र तसे होऊ शकत नाही. याचे कारण राजकारणाचा पहिला अर्थ राजकारण म्हणजे सामूहिक कृत्य, तर करिअर ही व्यक्तिगत बाब. या दोन्ही बाबींची सांधेजोड करायला गेल्यास राजकारणातील करिअरच्या अपयशाचा पाया रोवला जातो. राजकारणातील सामूहिकता थांबविण्याचा प्रयत्न केला, तर राजकारणाचा प्रवाहच त्याला तोडतो. 

पाच-सहा वर्षांतील स्थिती पाहिल्यास काँग्रेस पक्षातील सामूहिकता नष्ट झाली आहे. ती जागा भाजपने हस्तगत करत सामूहिकतेचा पुरस्कार केला आहे.’’ 

ते म्हणाले, ‘‘तरुणांनी तरुणाईची मने सामूहिक करता येऊ शकतील का, याचा विचार करावा. आज भाजपमध्ये दोनशे तरुण अभियंते काम करत आहेत. राजकारण सामूहिक पद्धतीने क्रिएट झाले आहे. ते एका इंजिनिअरने ‘क्रिएट’ केलेले नाही. इंदिरा गांधींच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभावी नेता म्हणून पुढे आले आहेत. मात्र ते एकट्या मोदी यांना जमले असते का? त्यांच्या मागे असणारी मातृसंस्था आरएसएस, आयटी संस्था आहे. एकटे निर्णय मोदी घेत नाहीत. मोदींसह शहा व संघांची व्यक्ती निर्णय घेते. राजकारणात ज्यांच्या हाती अपयश येत आहे, ते राजकारणाला स्वत:ची खासगी मालमत्ता समजतात. तशी इमेज उभी करतात.’’

देशातील तरुणांची उतावीळ, क्रांतिकारक, चंचल अशी प्रतिमा आहे. तरुण हा क्रांतिकारक, मध्यमवयीन समाजवादाकडे झुकलेला असतो. वृद्धापकाळात तो समतोलपणाने निर्णय घेतो, अशी कल्पना रुजलेली आहे. या कल्पनेची चिरफाड संजय गांधींनी केली. पण त्यांचे राजकारण उथळ होते. राजीव गांधी यांनी तरुणाईच्या राजकारणाचा शिक्का स्थिर केल्याचे त्यांनी सांगितले. 
 

ज्ञान हा राजकारणाचा पाया
राजकारणासाठी सामूहिक प्रयोगशाळा निर्माण करा
राजकारणातील स्पर्धा ही स्पर्धा परीक्षांपेक्षा तीव्र 
नॉलेज इंडस्ट्रीजची नितांत गरज 

डिजिटलबाबत प्रिपेअर राहा

याहूस डिजिटल मार्केटिंगचे संस्थापक सुजय खांडगे ‘डिजिटल मार्केटिंग’ विषयावर म्हणाले, ‘‘सोशल असो की प्रोफेशनल कनेक्‍ट, त्याची सुरुवात डिजिटलपासून होते. नव्या पिढीने डिजिटलबाबत प्रिपेअर असायला हवे. डिजिटल मार्केटिंग ॲट्रॅक्‍टिव्ह तितकेच डिस्ट्रॅक्‍टिव्ह आहे. डिजिटलवर तुम्ही काय लाईक करता, काय कमेंट करता, हे मित्रांपुरते मर्यादित असत नाही. डिजिटलच्या माध्यमातून समाजाला बरोबर घेऊन जाणे आवश्‍यक असते. डिजिटलवर कोणतीही गोष्ट मार्केटिंग करत असताना त्याचे ॲनेलिसिस आवश्‍यक असते. डिजिटलवर असणारे लोक क्रिएटिव्ह लोक हवेत. जे बदल स्वीकारायला तयार आहेत.’’ 

ते म्हणाले, ‘‘क्रिएटिव्हिटी प्लस मार्केटिंग, हे सूत्र नव्या पिढीने लक्षात घ्यावे. ज्यामुळे त्यांना डिजिटलमध्ये संधी काय, हे समजून येईल. नव्या पिढीने डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्यास पुढाकार घेतला, तर मागची पिढी डिजिटल स्वीकारायला मागे राहणार नाही. दुसरीत शाळा सोडलेला ५८ वर्षांचा माणूस मोबाईलवर ॲप डाऊनलोड करतो, तेव्हा त्याच्यातील सोशल चेंज लक्षात घेणे आवश्‍यक आहे. तुम्ही डिजिटलवर किती चांगल्या प्रकारे व्यक्‍त होता, हे महत्त्वाचे आहे. तुमचे ज्ञान ग्रासरूटपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही कष्टपूर्वक प्रयत्न करायला हवेत.’’ मार्केटिंग अँड सेल्समध्ये टूल्स, टेक्‍निक्‍स, स्ट्रॅटेजीचा समावेश होतो. फेसबुक, गुगल, गुगल मॅप, व्हॉटस्‌ॲप हे टूल्स असून ते जबाबदारीने हाताळणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

पाच तास डिजिटलवर असणारा आपला कस्टमर असेल.
डिजिटल मार्केटिंग कसे काम करते, याची माहिती हवी. 
एखाद्या पोस्टला कसे रिॲक्‍ट व्हायचे, याची जबाबदारी तुमची
सोशल मीडियावर देशाला रिप्रेझेंट करत आहात, याचे भान ठेवा. 

प्रत्‍येकाशी संवाद ठेवा 

सुप्रसिद्ध सल्लागार डॉ. राम गुडगीला यांनी ‘टीम बिल्डिंग’ विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘आपल्या समाजात मुलगा अठरा वर्षांचा झाला, तरी अजून तू लहान आहेस, असे म्हणण्याचा पगडा आहे. अठरा वर्षानंतरच्या आयुष्यात मात्र दोन प्रकार पडतात. त्यात आयुष्यात मोठे होण्याचे स्वप्न पाहणारा एक गट असतो, तर दुसरा एकटेपणाने जगण्यातल्या असतो. समूह भावनेचा विचार करताना  कोणत्याही देशाचा लीडर एक की अनेक असू शकतात? याचा आढावा घेतल्यास तो एकच असतो, हे लक्षात घेईल. समूह भावनेत काम करताना तुमच्या लीडरची दिशा निश्‍चित असणे आवश्‍यक आहे. समूहात अनेक स्वभावाचे लोक असल्याने काही ठाम, काही आक्रमक, तर काही जण तटस्थ असतात.’’

ते म्हणाले, ‘‘समूहात कित्येक प्रकारचे लोक असले, तरी त्यांना समजून घेऊन काम करण्याची एक हातोटी असते. ते लीडरला साधता आली पाहिजे. प्रत्येकाकडे जे चांगले गुण आहेत, ते हेरून त्यांच्याकडून काम करून घेता यायला हवे. समूहात काम करताना डोळ्याने पाहिल्याशिवाय, कानाने ऐकल्याशिवास विश्‍वास ठेवायचा नाही, हे सूत्र लक्षात ठेवा. दुसरे असे, की समूह म्हटला, की प्रत्येकात काहींना काही उणिवा असतात. त्या समजून प्रत्येकाशी संवाद ठेवा.’’ 

समूहातील प्रत्येकाच्या क्षमता बळकट करा
छोट्या गोष्टींचे डॉक्‍युमेंटेशन करायला शिका करा
कुणी काय करायचे, याची निश्‍चित केल्यास यशस्वी व्हाल 
कोणाच्या तरी मदतीशिवाय आपण करिअर करू शकत नाही.

यूथ लीडर्स ही विधायक ऊर्जा - आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी 

कोल्हापूर - यूथ लीडर्स ही देशाच्या विकासातील विधायक ऊर्जा आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आज येथे केले. 
डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘यिन समर समीट’च्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी प्रस्तुत व नीलया एज्युकेशन ग्रुप पॉवर्ड बाय असणाऱ्या समीटसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व विद्या प्रबोधिनी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र यांचे सहप्रायोजकत्व आहे. वि. स. खांडेकर भाषा भवनात समीटचे आयोजन केले आहे. 

डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘प्रशासकीय कामात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. कारण लोकचळवळीतूनच समाज प्रबोधन घडत असते. यासाठी यूथ लीडर्सनी सामाजिक उपक्रमात योगदान दिल्यास नक्कीच बदलाला हातभार लागेल.

देशाला विकासाची दिशा देण्याचे काम यूथ लीडर्सकडून अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांना योग्य वयात दिशा मिळाली नाही, तर ते विघातक मार्गावर जाण्याची भीती आहे. त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांच्याकडून सामाजिक उपक्रम करवून घ्यायला हवेत. लीडर्सने रस्त्यावर उतरून काम केल्यास त्यांचे व्यक्तिमत्त्व परिपक्व होईल.’’ 

यिनच्या सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे म्हणाले, ‘‘युवकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वात भर पडावी तसेच त्यांचा समाज व करिअरकडे पाहण्याचा दृष्ठीकोन बदलावा, या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले आहे. येत्या चार वर्षात भारत हा जगातील सर्वात तरूण देश असणार आहे. यासाठी तरूणाई केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करण्याची गरज आहे. पण युवकांना योग्य दृष्टी व मार्गदर्शनाची गरज आहे. यिन हे त्यांच्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे. आज जग झपाट्याने बदलत आहे. 

तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे करियरच्या संधी जशा निर्माण झाल्या, तशी आव्हानेही आहेत. या परिस्थितीत यशस्वी व्हायचे असेल, तर काम करण्याची पद्धत बदलावी लागेल.’’ 

विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव म्हणाले, ‘‘युवकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला हवे. संसदीय लोकशाहीच्या या देशात युवकांना बाजूला ठेवून कसे चालेल ? त्यांच्यातील नेतृत्त्वाला वाव दिला, तरच त्यांचा विकास घडेल. ज्याचा कुटुंब, नातलग, समाज व देशावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.’’ 

विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, ‘‘ समाजाला काय हवे आहे. हे ‘सकाळ’ माध्यम समुह नेमकेपणाने ओळखते. त्याआधारावरच त्यांचे सामाजिक उपक्रम सुरु असतात. कोल्हापुरामध्ये लोकसहभागातून ज्या सामाजिक चळवळी झाल्या, त्याला सकाळ माध्यम समुहाचे पाठबळ लाभले हे नाकारून चालणार नाही.’’

श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टचे राजू मेवेकरी यांनी ‘सकाळ’ने आपल्या चांगल्या कामाला नेहमीच शाबासकीची थाप दिल्याचे स्पष्ट केले. यिन मुख्यमंत्री अनिकेत मोरे याने यिन निवडणुकांप्रमाणे होऊ घातलेल्या महाविद्यालयीन निवडणुकांमुळे युवकांतील नेतृत्वाला चालना मिळेल, असे सांगितले. 

या प्रसंगी ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, यिनचे महाराष्ट्र प्रमुख तेजस गुजराथी, यिन क्रीडामंत्री तेजस्विनी पाटील उपस्थित होते. जयश्री देसाई हिने सूत्रसंचालन केले. अजिंक्‍य शेवाळे याने आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The positive energy of the youth will change