जानेवारीनंतर जोरदार द्राक्ष हंगामाची शक्‍यता

विष्णू मोहिते 
Tuesday, 15 December 2020

जिल्ह्यात आगाप द्राक्ष हंगामाच्या सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील लिंगनूर, कोंगनोळी, सावळज, पळसी परिसरातील काही प्लॉट विक्रीसाठी आले आहेत. लिंगनूर आणि कोंगनोळीतील मोजक्‍याच बागांत काढणी सुरु झाली आहे.

सांगली : जिल्ह्यात आगाप द्राक्ष हंगामाच्या सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील लिंगनूर, कोंगनोळी, सावळज, पळसी परिसरातील काही प्लॉट विक्रीसाठी आले आहेत. लिंगनूर आणि कोंगनोळीतील मोजक्‍याच बागांत काढणी सुरु झाली आहे. चार किलोच्या पेटीचा दर सध्यातरी 350 ते 420 रुपयांदरम्यान आहे. जानेवारीनंतर जोरदार हंगामाची शक्‍यता आहे. 

हवामानातील बदलामुळे बागायतदार दरवर्षी नव्या संकटांना समोरे जातात. दोन वर्षे प्रचंड पाऊस झाला. अतिवृष्टी झाली. थंडी सुरु असल्याने द्राक्षमणी फुगवणीवर परिणाम होत आहे. त्यात धुके, ढगाळी वातावरण, बाग पोंग्यात आणि फुलोऱ्यात असताना पाऊस व खराब हवामानामुळे यंदा घड कुजवा वाढला. अनेक बागांत घड पडले. मात्र वांझ काढण्यापूर्वीच ते जिरले. नैसर्गीक आपत्तींना तोंड देत आगाप द्राक्ष सध्या स्थानिक मुंबई, बंगळूर बाजारात दाखल होत आहेत. मिरज तालुक्‍यातील लिंगनूर, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील कोंगनोळी येथील आगाप द्राक्ष प्लॉटची विक्री सुरु झाली आहे. तासगाव तालुक्‍यातील सावळज परिसरातील द्राक्षही येत्या आठ-दहा दिवसात विक्रीसाठी येणार आहेत. यंदाच्या खराब वातावरणाचा जिल्ह्यातील 80 हजार द्राक्ष क्षेत्रापैकी किमान 30 टक्के परिणाम झाला आहे. 

द्राक्ष बागातील घडाची संख्या कमी असल्यामुळे यंदा दरातील तेजी राहिल, अशी सध्या चर्चा सुरु असली तरीही 1 ते 15 ऑक्‍टोबर या कालावधीत सर्वाधिक बागांची छाटणी झाल्यामुळे एकाचवेळी माल काढणीला येणार आहे. त्याचा परिणाम दलालांकडून दर पाडण्यात होईल, याची भीती वाटते आहे. जिल्ह्यात दलालांनी द्राक्ष खरेदी करण्यापूर्वी त्यांची सांगली बाजार समितीसह अन्य समित्यांत नोंदणीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने राबवण्याची गरज आहे. फसवणूक झाल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांकडे धावाधाव करण्यापूर्वी आता शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही नोंदणीसाठी शेतकऱ्यांचे प्रबोधनाची गरज आहे. 

लांबी, रंग, गुणवत्ता पाहून खरेदी
साधी सोनाक्का, सुपर सोनाक्का, आर. के, सोनाक्का, ज्योती, एसएसएन, अनुष्का या जातींना व्यापाऱ्यांकडून सध्या प्राधान्य दिले जात आहे. लांबी, रंग, गुणवत्ता पाहून द्राक्षाची खरेदी सुरु झाली आहे. 

"कोरोना' लाट नसल्याने दिलासा 
द्राक्ष हंगाम सुरु झाले आहेत. मालाची काढणी आणि पश्‍चात कामांसाठी कोरोना साथीकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी साथ येणार अशी चर्चा होती. प्रत्यक्षात तशी शक्‍यता कमी असल्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of strong grape season after January