बाप्पाच्या स्वागतास ढोल-ताशा पथकांची रंगीत तालीम 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 August 2019

शहरांपासून खेडेगावांपर्यंत पारंपरिक वाद्यांना महत्त्व आले आहे. अनेक गणेशोत्सव मंडळे ढोल-ताशा पथकाला पसंती देत आहेत.

सातारा  : लाडक्‍या गणपती बाप्पांचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाप्पांचे स्वागत वाजत गाजत करण्यासाठी ही ढोल-ताशा पथकेही आतुरली आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शहरे, गावांमध्ये तसेच डोंगरकपाऱ्यांत आता "वाजव रे... धन ताक्‌... धन ताक्‌...' असाच सूर घुमू लागला आहे. 
महाराष्ट्राला लोककलेची परंपरा असून, ती आजही तितक्‍याच दिमाखात जपली जात आहेत. गणेशोत्सवात या लोककला, वाद्यांना प्रचंड मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून "आवाजाच्या भिंती'ना बंदी केली आहे. त्यामुळे मोठ्या आवाजांचे स्पीकर बंद झाले आहेत. परिणामी, पारंपरिक वाद्यांचा आवाज आता सर्वदूर पसरला आहे. अनेक वाद्यपथकांना "अच्छे दिन' आले आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काही दिवस राहिलेले आहेत. हा आगमन सोहळा म्हटले की, आपल्याला दिसतो तो आकाशात उंचावणारा भगवा ध्वज आणि ऐकू येतो तो ढोल-ताशांचा गजर. अशीच काही ढोल-ताशा पथके बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागली आहेत. 
गणेशोत्सवापूर्वी सराव होण्यासाठी ही पथके नागरी वस्तींपासून दूर डोंगरकपाऱ्यांत ढोलताशा वाजविण्याचा सराव करत आहेत. याकडे युवा वर्ग आकर्षित होत आहे. विशेष म्हणजे युवती, महिलांचीही स्वतंत्र पथके तयार झाली आहेत. शासनाने मोठ्या साउंड सिस्टिमवर बंदी आणली असल्याने शहरांपासून खेडेगावांपर्यंत पारंपरिक वाद्यांना महत्त्व आले आहे. अनेक गणेशोत्सव मंडळे ढोल-ताशा पथकाला पसंती देत आहेत. 

फक्‍त नादच खुळा... 
ढोल-ताशा पथकांची सुपारी सुमारे 50 हजारांपासून ते दीड-दोन लाखांपर्यंत मिळत असते. अनेक युवक, युवती हौस म्हणून वाद्यपथकात सहभागी होतात. युवा वर्गाच्या या नादामुळे शहरांसह गावागावांत ढोल-ताशा पथके निर्माण झाली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Practise of dhol tasha teams begins