आवाडेंना मोठा धक्का; इचलकरंजीचे 19 नगरसेवक काँग्रेसमध्येच

आवाडेंना मोठा धक्का; इचलकरंजीचे 19 नगरसेवक काँग्रेसमध्येच

इचलकरंजी - काँग्रेस पक्षांने प्रकाश आवाडे यांना जिल्हाध्यक्षपद दिले होते. त्यामुळे ते नाराज होण्याचे कारण नव्हते. त्यांनी अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. इतका मोठा निर्णय घेतांना त्यांनी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही, असा आरोप नगरसेवक शशांक बावचकर यांनी केला आहे. तसेच सर्व 19 नगरसेवक काँग्रेससोबतच राहणार असल्याचा, दावा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या निर्णयामुळे प्रकाश आवाडे यांना हा मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे.

येथील एका हॉटेलमध्ये आज दुपारी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची बैठक झाली. त्यामध्ये उपस्थीत नगरसेवकांनी काँग्रेससोबतच राहण्याचा एकमुखी निर्णय घेतला. बैठकीला 19 पैकी 17 नगरसेवक उपस्थीत होते. तर दोघांना अपरिहार्य कारणास्तव उपस्थीत राहता आले नसल्याचे नगरसेवक बावचकर यांनी सांगितले. 

श्री. बावचकर म्हणाले, "" गेली 40 वर्षे काँग्रेसने आवाडे यांना काम करण्याची संधी दिली. त्यांच्या शिवाय मतदान यादीवर कोणाचेही नाव आले नाही. असे असतांना आवाडे यांनी अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

वास्तविक विद्यमान आमदारांच्याबाबत नाराजी होती. त्यामुळे आवाडे यांना यावेळी मोठी संधी निर्माण झाली होती. पण 370 कलमाचे निमित्त करुन पक्षाचा सोडचिठ्ठी देण्याचा त्यांनी केलेला खुलासा हा हास्यास्पद आहे.

- शशांक बावचकर

श्री. बावचकर म्हणाले, आमदारांच्या लेखाजोखा प्रकाशनावेळी दहशतीची भाषा वापरण्यात आली होती. चौकश्‍या लावण्याची धमकी दिली होती. त्याचा तर आवाडे यांचा पक्ष सोडण्याबाबतच्या निर्णयाशी कांही संबंध आहे काय, याची तपासणी करण्याची गरज आहे.

इचलकरंजी पालिकेतील काँग्रेसचे सर्व 19 नगरसेवक काँग्रेस सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या बैठकीला 17 नगरसेवक उपस्थीत होते. तर अमरजीत जाधव हे आजारी असल्यामुळे व सुनिल पाटील हे बाहेर गावी असल्यामुळे उपस्थीत राहू शकले नाहीत. त्यांच्याशी बोलणे झाले आहे. यापुढील काळात नक्की कॉंग्रेसला अच्छे दिन येणार असून आता पक्षात एकाधिकार शाही असणार नाही. यापुढे एकत्रितपणे निर्णय घेतला जाणार असून यापुढे कॉंग्रेस पक्षाचे काम चालूच ठेवणार आहोत, असेही बावचकर यांनी सांगितले. 

याबाबत पी. एन. पाटील, सतेज पाटील व जयवंतराव आवळे यांच्याशी चर्चाही झाल्याचे श्री. बावचकर यांनी सांगितले. काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक संजय कांबळे, राहूल खंजीरे, राजू बोंद्रे, अमृत भोसले उपस्थित होते.

उमेदवारी मिळाल्यास लढणार - खंजीरे
काँग्रेसकडून उमेदवारी दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे नगरसेवक राहूल खंजीरे यांनी सांगितले. पण उमेदवारीचा निर्णय पक्ष घेणार असून पक्षांने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याचेही यावेळी श्री.खंजीरे यांनी सांगितले. कांही मतभेदामुळे पक्ष सोडण्याची आवाडेंची भूमिका चुकीची व निषेधार्ह असल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेस कमिटीतूनच कारभार
सध्या तरी काँग्रेस कमिटीतून कामकाज सुरु ठेवले जाणार असून सध्या इमारतीची माहिती घेण्याचे काम सुुरु आहे, असे श्री. बावचकर यांनी सांगितले. आवाडे यांची पक्षाच्या कामाची संथगती पाहता त्यांचा निर्णय अपेक्षीतच होता, असेही धक्कादायक विधान श्री.बावचकर यांनी केले.

एक एकिकडे दोन दुसरीकडे
शहर काँग्रेसचे नूतन अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी आवाडे यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतला. तर कार्याध्यक्ष संजय कांबळे व युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमृत भोसले हे कॉंग्रेस सोबत राहणार आहेत. आज याबाबतचे चित्र स्पष्ट झाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com