क्रांतिदिनापासून ज्याचा माल त्याचा हमाल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

कोल्हापूर - ट्रक भरताना आणि उतरवताना हमाली देऊन ट्रक मालक कंगाल होत आहेत. एकीकडे ट्रकचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढायचा आणि पुन्हा ट्रकमधील मालाचा इन्शुरन्सही द्यायचा. यामुळे वाहतूक व्यवसाय परवडत नाही. म्हणूनच 9 ऑगस्टपासून "ज्याचा माल त्याचा हमाल', "ज्याचा माल त्याचा इन्शुरन्स'. हा निर्धार आज कोल्हापूरसह सांगली, सातारा, कराड येथील ट्रकचालक, मालक आणि लॉरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

कोल्हापूर - ट्रक भरताना आणि उतरवताना हमाली देऊन ट्रक मालक कंगाल होत आहेत. एकीकडे ट्रकचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढायचा आणि पुन्हा ट्रकमधील मालाचा इन्शुरन्सही द्यायचा. यामुळे वाहतूक व्यवसाय परवडत नाही. म्हणूनच 9 ऑगस्टपासून "ज्याचा माल त्याचा हमाल', "ज्याचा माल त्याचा इन्शुरन्स'. हा निर्धार आज कोल्हापूरसह सांगली, सातारा, कराड येथील ट्रकचालक, मालक आणि लॉरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याबाबत जिल्हाधिकारी आणि विविध व्यापारी असोसिएशनना निवेदन देण्याचेही बैठकीत ठरले. शाहुपूरी येथील वसंतराव चौगुले नागरी पतसंस्थेच्या हॉलमध्ये आज ही बैठक झाली. 

ट्रक आणि टेंपोचालक, मालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी (ता. 26) बैठक झाली. यावेळी तीनही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचे ठरले होते. जिल्ह्यासह निपाणी, सांगली, कराड येथील ट्रकचालक, मालक सहभागी होते. हमाली, डिझेलचे वाढलेले दर, ट्रकचा थर्ड पार्टी इन्शुरन्स, ट्रकचा मेंटेनन्स याच्या खर्चाचा मेळ बसत नाही. याच्या तुलनेत भाडे दर मात्र कमी आहेत. त्यामुळे परराज्यातील एका खेपेमागे केवळ दोन अडीच हजारांवर समाधान मानावे लागते. त्यामुळेच इथून पुढे हमाली आणि मालाचा इन्शुरन्स हा ज्याचा माला भरणाऱ्या मालकानेच द्यायचा. अशी भूमिका सर्वांनी घेतली.

या निर्णयाची अंमलबजावणी 9 ऑगस्टपासून होणार आहे. हा निर्णय एकमताने घेण्यात आला. यासाठी मंगळवारी (ता.30) शाहुपूरी कार्यालयातून मोर्चाने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. सर्व व्यापारी आणि उद्योजकांच्या संघटनांना बुधवारी (ता. 31) निवेदन देण्यात येणार आहे. जो व्यापारी, उद्योजक याला विरोध करेल त्याच्या दारात असोसिएशन आंदोलन करेल असेही सांगण्यात आले. 

कोल्हापूर लॉरी असोसिएशनचे हेमंत डिसले, प्रकाश केरसकर, भाऊ घोगळे, जगदीश सौमय्या, गोविंद पाटील कराडमधून संदीप मोहिते, प्रदीप शेवाळे, महादेव माने, अल्ताफ सवार, मन्सुर मोदी, राहुल पाजुरी, परशुराम सुर्यवंशी जिल्हा वाळी संघटनेचे विजय पाटील, विजय चेरदाळे, भाई पटवेगार, अतुल जाधव, यांच्यासह ट्रकचालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

डिझेल दरवाढ, विविध कर, टोल यातील एकही गोष्ट स्थानिक पातळीवर ठरणारी नाही. त्यामुळे ट्रक मालकाला व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर त्याच्या हातातील गोष्टींबद्दलच विचार केला पाहिजे. हमाली आणि विम्याची रक्कम जरी वाचली तरी व्यवसायास चालना मिळू शकेल. हा व्यापक उद्देश ठेवून सर्वांनी असोसिएशनला सहकार्य करावे आणि ज्याचा माल त्याचा हमाल आणि विमा ही भूमिका स्वीकारावी. 
- सुभाष जाधव,
अध्यक्ष, कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Subhash Jadhav comment